शहाजहान

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास

शहाजहान - बाप मेला तेव्हां हा दक्षिणेंत जुन्नरकडे होता. त्याचा सासरा असफखान यानें त्याला गादीवर बसविण्यांत मदत केली. शहाजहाननें आपले निकटचे सर्व पुरुष नातेवाईक अनेक क्रूर उपायांनीं ठार मारले. झुंजारसिंग बुंदेल्यानें बुंदेलखंड स्वतंत्र करण्यासाठीं शहाजहानशीं आठ वर्षे जोराचा झगडा केला. शहाजहानचा एक सरदार खानजहान लोदी यानें बंड केलें व निजामशहाचा आसरा घेतला पण पुढें त्याचा एका लढाईत अंत झाला, यापुढें कोणी शत्रू न उरल्यानें शहाजहाननें आपलें लक्ष चैनीकडे वळविलें. आग्य्राच्या राजवाडयांत एक चांदीसाठीं व एक सोन्यासाठीं अशीं दोन तळघरें होतीं. प्रत्येक तळघर ७० फूट चौरस व ३० फूट उंच होतें. अकबराच्या वेळेपासून जमविलेलें अमूल्य जडजवाहीर खर्चून शहाजहाननें बेबदल खान नांवाच्या कारागिरास सात वर्षे खपवून प्रख्यात मयूरसिंहासन तयार केलें. या सिंहासनाचे पाय सोन्याचे, वर एक जडावाची मेघडंबरी, तिचे रत्नजडित १२ खांब, दर्शनी बाजूस दोन बहुमूल्य रत्नजडित मोर व त्यांच्यामध्यें एक जडावाचें झाड असें हें सिंहासन असून त्याची किंमत कमीतकमी १ कोटी रुपये होती. हें सिंहासन १७३९ त नादीरशहानें इराणास नेलें; पुढें त्याची मोडतोड झाली. याखेरीज आणखी सहा सिंहासनें होतीं. मयूरसिंहासन घडविणें चालू असतांच गुजराथेंत व दक्षिणेंत भयंकर दुष्काळ पडला तो इतका कीं आईबापें आपलीं पोटचीं पोरेंच खाऊं लागलीं व रस्त्यावरच्या प्रवाशास बुभुक्षित लोक फाडून खाऊं लागले (१६३०-३१). याच दुष्काळांत शहाजहानची आवडती बेगम मुम्ताझ महल ही मेली. तिचें थडगें जगविख्यात ताज महालांत आहे. तिला एकंदर १४ मुलें झालीं. दारासुजादि भांडणारें चार भाऊ यापैकींच होत. पोर्तुगीजांनीं कलकत्याजवळील हुगळी गांवीं १५७९ च्या सुमारास एक वखार घालून प्रथम तंबाखूचा व्यापार सुरू केला. पण पुढें त्यांनीं गुलामांचा व्यापार व जुलमानें बाटविण्याचें काम चालविल्यानें शहाजहाननें त्यांनां हुगळीहून हांकलून देऊन तीन वर्षेपर्यंत त्यांनां कडक शिक्षा देण्याचें सुरू ठेविलें होतें. त्याच वेळीं त्याने अनेक हिंदु देवळें पाडलीं. बाप व आजा यांचें धर्मविषयक उदार धोरण त्यानें ठेविलें नाहीं, मलिक अंबर मेल्यावर व शहाजीला पाठबळ न राहिल्यामुळें शहाजहाननें निजामशाही बुडविली आणि त्या कामीं आदिलशहाची मदत घेतली; तसेंच फत्तेखान या निजामशाही सरदारानें व शहाजीनें निजामशाही तगविण्याच्या खटपटीविरुध्द १०॥ लाख रुपये लांच खाऊन शहाजीशीं फितुरी केली (१६३२). शहाजीनें शहाजहानसारख्या बादशहास सात आठ वर्षे आपल्या मराठा घोडदळासह टक्कर देऊन दविलें होतं. आदिलशहानें शहाजहानास मदत करू निजामशाहीचा अर्धा वांटा स्वतःस मिळविला (१६३६). या वेळी खानदेश (राजधानी बुर्‍हाणपूर व अशीरगड किल्ला), वर्‍हाड (राजधानी इलिचपूर व गावीलगड किल्ला), तेलिंगण (राजधानी नांदेड व खंदार किल्ला) आणि दौलताबाद (राजधानी खडकी उर्फ औरंगाबाद व देवगिरी किल्ला) मिळून दक्षिणचा सुभा होऊन त्यावर औरंगझेब हा १८ व्या वर्षी सुभेदार नेमला गेला. या सुभ्याचें उत्पन्न ५ कोटी रु. असून त्यांत ६४ किल्ले होते, त्यांपैकीं पुष्कळसे शहाजीच्या ताब्यांत होते. औरंगझेबानें आठ वर्षे (१६३६- ४४) सुभेदारी केल्यावर बापाच्याविरुध्द कांही उलाढाली केल्यानें बापानें त्याला आठ महिने बडतर्फ केलें. पुढें त्याला २ वर्षे गुजराथचा व नंतर बल्खचा सुभेदार नेमलें. त्यावेळीं औरंगझेबानें बल्खवर स्वारी केली, पण तींत त्याचा सपाटून पराभव झाला (१६४७); तेव्हां त्याची नेमणूक मुलतानच्या सुभेदारीवर झाली. त्यानंतर पाच वर्षे कंदाहार हें इराणच्या शहापासून जिंकण्याचा औरंगझेबानें जोराचा प्रयत्न केला पण प्रत्येक पाळीला त्याचा पराजय झाला (१६४९- ५३). या लढायांत हिंदी तोफखान्यापेक्षां इराणी तोफखाना श्रेष्ठ ठरला. पुढें केव्हांहि कंदाहार मोंगल बादशहांच्या हातीं पडलें नाहीं. शहाजहानच्या (१६४८ च्या वेळच्या) राज्याचें एकंदर उत्पन्न २५ कोटी रुपये होतें; वरील कंदाहार स्वार्‍यांत १२ कोटी रु. खर्च झाले.यावेळीं यूरोपशीं होणार्‍या व्यापाराच्या हुंडणावळीचा भाव दर रुपयास २ शिलिंग ३ पेन्स होता. औरंगझेबानें वायव्य सरहद्दीवरील लढायांत मार खाल्ल्यानें त्याला पुन्हां दक्षिणच्या सुभेदारीवर पाठविलें (१६५३). या वेळीं या सुभ्याची सर्व तर्‍हेनें खबरदारी झाली होती. त्यामुळे मुर्शिद कुलीखान यानें या सुभ्यांत तोडरमल्ली तरमबंदी सुरू केली व पूर्वीची नांगरसार्‍याची (दरेक नांगरागणिक सारा बसविणें) पध्दत बंद केली; मात्र सारा नख्ताप्रमाणें ऐन जिन्नसीहि भरण्यास सवड ठेविली (१६५६- ५८). यानंतर औरंगझेबानें विजापूर व गोवळकोंडे येथील राज्यें जिंकण्याचा उद्योग आरंभिला. हीं दोन्हीं राज्यें शियापंथी तर मोंगली राज्य सुन्नीपंथी असल्यानें त्यांच्यांत धार्मिक वैर होतेंच. गोवळकोंडें तर १६३६ पासून दिल्लीचें मांडलिक राज्य बनलें होतेंच. तेथील वझीर मीर जुम्ला हा महत्त्वाकांक्षी होता. त्यानें ४० लाख रुपये उत्पन्नचा कर्नाटकप्रांत स्वतःच्या हाताखालीं दाबून उत्तम सैन्य व यूरोपियन अंमलदारांचा तोफखाना जवळ ठेवला व कुत्बशहाशीं फितुरी करून तो औरंगझेबास मिळाला. तेव्हां औरंगझेबानें गोवळकोंड्यास वेढा देऊन आसपासचा मुलूख लुटून फस्त केला. शेवटीं बरीच खंडणी वलांच घेऊन शहाजहाननें औरंगझेबास वेढा उठविण्यास भाग पाडलें (१६५६). मद्रास येथें १६३९ त इंग्रजांनीं जागा विकत घेऊन वखार घातली. औरंगझेबानें गोवळकोंड्यानंतर विजापुरावर फितुरी मीर जुम्ला यांच्या मदतीनें चाल केली. आपला टिकाव लागत नाहींसे पाहून आदिलशहानें कांही किल्ले व प्रांत देऊन त्याच्याशीं तह केला (१६५७). इतक्यांत शिवाजीनें मोंगली मुलखांत स्वार्‍या करण्यास प्रांरभ केला व तिकडे शहाजहानहि बराच आजारी पडला. त्यामुळें स्वतः गादी बळकावण्यासाठीं औरंहझेबानें आदिलशहा व शिवाजी यांच्याशीं तह करून आग्य्राकडे मोर्चा पिरविला. वास्तविक दारा, शुजा, औरंगझेब व मुराद हे चौघे सख्खे भाऊ असून त्यांच्यांत परस्परमत्सर व गादीवर बसण्याबद्दलची तीव्र मनीषा होता. ‘’तख्त, (गादी) या (किंवा) तख्त (थडगें)’’ ही त्याची प्रतिज्ञा होती आणि त्यासाठीं या चौघांनीं सूक्तासूक्त वाटेल त्या खटपटी केल्या. दारावर बापाची मर्जी फार म्हणून प्रथम तिघांनीं त्याच्याविरुध्द लढाई करून त्याला नामशेष केलें आणि पुढें औरंगझेबानें उरलेल्या दोघांनां वाटेंतून दूर करून गादी बळकाविली (१६५८ मे). या कामांत अथपासून इतिपर्यंत औरंगझेबानें कपट, फितुर, वचनभंग इत्यादि अनेक गोष्टी केल्या आणि धूर्तता, तडफ, सावधानता, समयोचितपणा, निश्चयी स्वभाव, इत्यादि गुणांच्या जोरावर तिघा भावांनां व बापालाहि आपल्या मार्गातून दूर सारलें. दारा हा धर्माच्या कामीं सहिष्णु असून त्यानें कांहीं उपनिषदांचें फारशी भाषांतरहि करविलें होतें; तें कारण दाखवून औरंगझेबानें धर्णवेड्या मुसुलमानांनां आपल्या बाजूस ओढलें होतें; शिवाय कासीम खानानें धरमतच्या लढाईत दाराविरुध्द फितुरी केली होती. औरंगझेबानें शहाजहानास पकडून शेवटपर्यंत कैदेंत टाकलें, मुरादला फांशीं दिलें, शुजाला आराकानमध्यें कायमचें हांकून दिलें, शुजाला मदत केल्याबद्दल स्वतःचा मुलगा मुहम्मद याचा वध केला, दाराचा मुलगा सुलेमान याला विश्वासघात करून विष चारलें. दारावर नास्तिपणाचा आरोप ठेवून त्याचें डोकें उडविलें. हीं सर्व दुःखें सहन न झाल्यानें शहाजहानहि थोड्याच दिवसांत मेला (१६६६ जाने). शहाजहानमध्यें अनेक दुर्गुण व थोडेसे सद्गुण होते. त्याचा दरबार भपक्याचा असून त्यानें ताजमहालासारखी जगविख्यात इमारती बांधविली होती. परंतु त्यानें बापाविरुध्द बंड केलें, वडील भाऊ, व गादीच्या आड येणारे नातेवाईक यांनां ठार मारलें, मुमताज मेल्यावर बेअब्रू होईल इतका तो विषयी बनला व राजकीय कामांत क्रौर्य, विश्वासघात, वेजबाबदारपणा इत्यादि गोष्टी त्यानें केल्या. चोरांचा सुळसुळाट इतका होता कीं, त्यांचीं डोकीं उडवून, तसरीं ३० ते ४० डोकीं ज्या दगडी मिनारांत चुन्यानें चिणीत असत असले चोरमिनार एकट्या कानपूर जिल्ह्यांतच २६० होते. मात्र शुजाच्या कारकीर्दीत बंगालचा व्यापार व शेती भरभराटली होती आणि संपत्ति भरपूर होती. शहाजहानच्या कारकीर्दीत मोंगली व हिंदी कलाकौशल्य उच्च दर्जाचें होतें. या वेळचें शिल्प फारसें नसून भव्य व मजबूत कोमल व जनानी तर्‍हेच्या सौंदर्याचें होतें; लाल दगडाऐवजी संगमरवरी दगड पुढें आला. शहाजहानाबाद उर्फ दिल्ली १६४८ त नवीन वसविण्यास प्रारंभ केला. ताजमहालास २२ वर्षे लागलीं व हिंदीपारसिक शिल्पाचा उत्कृष्ट नमुना जी मोतीमशीद ती १६५३ त पुरी झाली. चित्रकलेंत यूरोपियन कलेचा थोडासा प्रवेश होऊन ती बरीच उच्च दर्जास गेली. या वेळीं कुंचल्याची सफाई इतकी होती कीं, खारीच्या शेपटीच्या एका केसाची सुद्धा कुंचली तयार होई व तिनें अत्यंत बारीक रंगीत चित्र रेखाटलें जाई. व्यक्तीचा चेहरा हुबेहुब दाखविण्याचें कौशल्यहि या वेळीं साधलें होतें. वीरसिंगानें सर्व हिंदुस्थानांतलें अत्यंत पैसा खर्चून (३३ लाख रु.) बांधलेलें- मथुरेचें केशवाचें देऊळ शहाजहानाच्या कारकीर्दीपूर्वी तयार झालें, त्यांत हिंदु शिल्प उत्तम दर्जाचें होतें तें औरंगझेबानें पुढें पाडलें. शहाजहानानें नवीन देवळें बांधूं दिलीं नाहींत. बादशाहा नामा व मुंतखबुल लुबाब हे फारशी इतिहास यावेळीं तयार झाले आणि बिहारीलाल हां नांवाजलेला हिंदी कवि पुढें आला.

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

महान सम्राट कृष्णदेव राय

समर्थ संप्रदाय