समर्थ संप्रदाय
समर्थ संप्रदाय
समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या कवींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखिते मुख्यत्वेकरून धुळ्याच्या श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरातउपलब्ध होतात. ती मिळविण्यासाठी समर्थभक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.
शिष्यमंडळसंपादन करा
कल्याण स्वामीसमर्थांनी त्या काळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली.त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते.ज्या वेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्या वेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई.समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा होती.दासबोधाचे नुसते पारायण करून भागात नव्हते, दासबोध समजाऊन घेण्यावर समर्थांचा भर होता.अनेक महंतांचा दासबोध कंठस्थ होता.शिष्याची परीक्षा घेण्याची समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती.त्यावेळी ग्रंथ छापले जात नसत.हाताने लिहून ग्रंथांचा नकला केल्या जात.छापी नसल्यामुळे ग्रंथ बांधलेले ( बाईन्डींग ) नसत.पानांवर पृष्ठांक देखील नसायचे.अशा वेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत.पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत.ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे.अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपती पदी नियुक्त केले जात नसे.ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत," याने दासबोध वाचला नाही केवळ गंधफुले वाहून पुजला."त्या वेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की, जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल.त्यासाठी वेगळा गुरु करण्याची गरज नाही.ग्रंथ हेच गुरु होत.
उद्धव स्वामी
आख्यायिका : नाशिक जवळील दशकपंचक गावचे गिरिधरपंत कुलकर्णी मृत्यू पावल्यावर त्यांच्या पत्नी सती चालल्या होत्या. त्यासाठी नदीकिनारी आल्यावर त्यांना एक तेजःपुंज यती (समर्थ रामदास) नदीमध्ये डोळे मिटून जप करत असताना दिसले. त्यांना त्या स्त्रीने नमस्कार केला. बांगड्यांचा आवाज ऐकून समर्थांनी त्यांना 'अष्टपुत्रा सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. परंतु मृत्यू पावलेला पती व स्वतःही सती जाऊन मृत्यूला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्र्या त्या स्त्रीने विचारले की हा आशीर्वाद कधी पूर्ण होईल? तेव्हा समर्थांनी हा आशीर्वाद रामाचा आहे असे सांगितले व मंत्र सामर्थ्याने त्या प्रेतास जिवंत केले. या दांपत्याला पुढे आठ मुले झाली. त्यातील पहिले म्हणजे उद्धव होते. उद्धवस्वामींच्या आई वडिलांनी त्यांना समर्थ चरणी अर्पण केले.
अन्य इतिहास : नाशिकजवळच्या दशपंचक गावचे सदाशिव दशपुत्रे (कुलकर्णी) आणि त्यांची पत्नी उमाबाई यांच्या पोटी झालेला उद्धव नावाचा पुत्र (जन्म : इ.स.१६२७) आईवडिलांनी रामदास स्वामींच्या स्वाधीन केला. रामदासांनी त्याला आपला शिष्य करून घेतले. हा रामदास स्वामींचा पहिला शिष्य. गोदावरीच्या पूर्वेला टाकळी गावात रामदासांचा आद्य मठ होता. समर्थ संप्रदायाची दीक्षा दिल्यानंतर त्या मठाचे अधिपत्य स्वामींनी उद्धवकडे सोपवले, आणि उद्धव हे उद्धवस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे इंदुरबोधन (मनमाड-हैदराबाद रस्त्यावरील हल्लीचे निजामाबाद) या गावी दुसरा मठ स्थापन केल्यावर, रामदास स्वामींनी तोही उद्धवस्वामींना चालवायला दिला. या दोन्ही मठांत उद्धवस्वामींच्या परंपरा सापडतात.
जांबेहून समर्थ सारंगपूर येथे आले. हे ठिकाण आंध्र प्रदेशात निजामाबाद्पासून सुमारे १५ मैलांवर आहे.त्या वर्षी आंध्र प्रदेशात प्रचंड दुष्काळ पडला होता.सर्वसामान्य प्रजा घोटभर पाण्यासाठी वणवण हिंडत होती. समर्थांनी सारंगपूरला पाहिले, की एका सरोवरात ६० ब्राम्हण उभे राहून काही तरी अनुष्ठान करत होते. समर्थांच्या बरोबर त्यांचा लाडका शिष्य उद्धव होता. समर्थांच्या सांगण्यावरून उद्धवने त्या ब्राम्हणांची भेट घेतली आणि अनुष्ठानाचे प्रयोजन विचारले. सारंगपूरच्या यवन अधिकार्याने दुष्काळासाठी या साठही ब्राम्हणांना वेठीला धरले होते. त्या ब्राम्हणांना पाऊस पडेपर्यंत घरी जाता येणार नव्हते. पाऊस पडावा म्हणून त्यांना सक्तीने अनुष्ठानाला लावले होते. हे सर्व प्रकरण कळल्यावर समर्थांनी त्या सरोवराशेजारील डोंगरावर हनुमंताची मूर्ती तयार केली.त्या मूर्तीवर भगवे वस्त्र ठेवले आणि ब्राम्हणांना सांगितले की, तुम्ही जर या हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला तर नक्की पाऊस पडेल. ब्राम्हणांना मोठी आशा वाटली.
समर्थाचे तेज पाहून त्यांनी मोठ्या श्रद्धेने हनुमंताला महारुद्राचा अभिषेक केला. त्यासरशी धो-धो पाऊस सुरू झाला. ब्राम्हण आनंदले. त्यांची सुटका झाली. ही वार्ता कळताच निजामाबादच्या सुलतानाने समर्थांना सन्मानपूर्वक निजामबादला नेले. त्यांना मठासाठी ५० एकर जमीन दान दिली. तिथे समर्थांनी प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधले आणि उद्धवस्वामींची मठपती म्हणून नियुक्ती केली. याच उद्धवांनी निजामाबादहून समर्थांना पत्र लिहिले. त्यात प्रार्थना केली -
"मला वाटते अंतरी त्वां वसावे | तुझ्या दासबोधासी त्वां बोधवावे | अपत्यापरी पाजवी प्रेमरसा | महाराज्या सद्गुरू रामदासा ||'
टाकळी येथे समर्थांनी त्यांना गोमयाची मारुतीची मूर्ती दिली. १६३३च्या मार्च महिन्यातील हनुमान जयंतीच्या दिवशी समर्थानी स्वतःच्या हातांनी ह्या गोमयी मिश्रणाच्या मूर्तीची स्थापन केली. समर्थानी स्थापन केलेला हा पहिला मारुती. पुढे रामदास स्वामींनी आणखी दहा मारुती स्वहस्ते स्थापन केले.
उद्धवस्वामींचे देहावसान शके १६३२मध्ये (इ.स.१७१०मध्ये) फाल्गुन पक्षातल्या शुद्ध प्रतिपदेला बुधवारी सूर्योदयाच्या वेळी झाले, असे इंदुरबोधन मठातील एका बाडात लिहिलेले आहे. उद्धवस्वामींची मुख्य समाधी टाकळीला आहे, आणि पूजेसाठी दुसरी समाधी इंदुरबोधन मठात बांधलेली आहे.
उद्धवस्वामींची काव्यरचना श्लोक, पदे, प्रकरणे या स्वरूपाची आहे. त्यांतील वर्णनावरून उद्धवस्वामींची रामदासांवर अतिशय निष्ठा असल्याचे कळून येते. त्यांनी शिवराम या नावानेही काही रचना केल्या आहेत.
- आम्हीहि पाषाण श्रीनें कमावीलों । शिवराम जालों पावन चि॥ असे त्यांनी लिहून ठेवले आहे. उद्धवस्वामींनी रामदास स्वामींचे गद्य चरित्र लिहिले आहे, असे म्हणतात, पण अजूनपर्यंत ते सापडलेले नाही.
शं.श्री.देव यांनी ’श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी’ असे नाव असलेले उद्धवस्वामींचे चरित्र लिहिले आहे.
दत्तात्रय स्वामी
दत्तात्रेय स्वामी हे कल्याण स्वामींचे सख्खे धाकटे बंधू होते. समर्थांनी कोल्हापुरला अंबाबाईच्या देऊळात कीर्तने चालू असता ,एक चुणचुणीत मुलगा अंबाजी(कल्याण स्वामी) पाहिला व आपल्या कार्यासठी त्याची मागणी करताच ,त्याची आई व धाकटा भाऊ दत्तात्रय हे तिघेंही समर्थांना शरण आले.ह्या त्रिवर्गासह समर्थ शिरगांवांत आले.तिथे गोमय मारुति स्थापून दत्तात्रय स्वामींना मठपति नेमले.तोच हा शिरगांव चा मूळ मठ.
सातारा - उंब्रज मार्गावर काशीळ फ़ाट्या वरुन श्री खंडोबाची पाल ह्या रस्त्या वरुन २ कि. मी.वर शिरगांव फ़ाटा पडतो.तेथून दीड कि.मी. अंतरावर हा मठ आहे.दत्तात्रय स्वामींचे सुंदर समाधी मंदिर ही शिरगांव मठात बांधण्यात आले आहे.श्री दत्तात्रय स्वामींचे पुत्र आणि शिष्य राघव स्वामी यांची मुंज समर्थाच्या मांडीवर शिरगांव ला झाली.त्यांचे पुत्र आणि शिष्य श्री यशवंत स्वामी हे मनोबोधाच्या आरतीचे रचियिते होते.
गोपालदास
१६३५ साली समर्थ राजस्थानात जयपूरला आले.तिथे आचार्य गोपालदास त्यांचे शिष्य झाले.गोपालदासांवर समर्थांनी केलेला देशभक्तीचा संस्कार दीर्घकाळ टिकून होतो. १६७० साली औरंगजेबाच्या धर्मवेडास उधान आले.या देशात राहण्यासाठी हिंदूंनी राहण्यासाठी हिंदू जिझिया करभरला पाहिजे, असे फर्मान औरंगजेबाने काढले.आचार्य गोपालदास यांनी हा कर भरण्यास नकार दिला.त्यांना अटक करून औरंगजेबाच्या दरबारात आणले गेले. तिथेदेखील त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आणि कर भरण्यास नकार दिला. औरंगजेबाने आपल्या मारेकऱ्यांना आचार्यांची हत्या करण्यास सांगितले.परंतु मारेकरी पोहोचण्यापूर्वीच गोपालदासांनी आपल्या कुबडीतील तलवार स्वतःच्या छातीत खुपसून आत्मसमर्पण केले.गोपाल दासांच्याच घराण्यातील १० वे पुरुष रामचंद्रवीर हे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बरोबर होते .रामचंद्रवीरांचे सुपुत्र आचार्य धर्मेंद्र महाराज आजही धर्मजागृतीचे काम करीत आहेत.याचा अर्थ समर्थांनी १६३५ साली जयपुरात पेटवलेली देशभक्तीची ज्योत अजूनही तेवत आहे.
भीम स्वामी
मूळचे साताऱ्याजवळच्या शहापूरचे असणारे भीमस्वामी हे समर्थांच्या आज्ञेवरून तामिळनाडू प्रांतामधील तंजावर येथे गेले. तेथेच त्यांचा मठ व समाधी आहे .त्याना ९९ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले .
छत्रपती श्रीमंत प्रतापसिंहराजे भोसले (तंजावरकर)(इ.स. १७३९ ते १७६३) व समर्थ संप्रदायाचे घनिष्ठ संबंधसंपादन करा
श्रीसमर्थशिष्य श्री भीमस्वामी शहापूरकर रामदासी इ.स. १६७७ पासून इ.स. १७४२ पर्यंत तंजावरात रामदासी मठाधिपति म्हणून राहिले व त्यांनी दक्षिण भारतात श्रीरामभक्तीचा प्रचार व प्रसार केला. या कालखंडात तंजावर भोसले राजदरबारात राजसत्ता चालविणारे राजे खालीलप्रमाणे होत...
१) श्रीमंत व्यंकोजी राजे भोसले इ.स. १६७७ ते १६८३
२) श्रीमंत शहाजी राजे भोसले इ.स. १६८४ ते १७१२
३) श्रीमंत शरभोजी राजे भोसले (पहिले) इ.स. १७१२ ते १७२८
४) श्रीमंत तुळजेंद्र राजे भोसले (पहिले) तथा तुकोजी इ.स. १७२८ ते १७३५
५) श्रीमंत एकोजी राजे भोसले (दुसरे) इ.स. १७३६ ते १७३९
६) श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले इ.स. १७४० ते १७६३
७) श्रीमंत तुळजेंद्र राजे भोसले (दुसरे) १७६३ ते १७८७
श्रीभीमस्वामी तंजावर मठात सुमारे ६३ वर्षे होते. सर्व भोसले वंशीय राजे भीमस्वामींस यथोचित आदर सत्कार करीत असत. सर्वप्रथम व्यंकोजीराजेंनी रामदासी दीक्षेचा स्वीकार केला व तदनंतर प्रतापसिंह राजे रामदासी झाले. त्यांच्या दीक्षेमागे एक रंजक कथा तंजावरात सांगितली जाते, ती अशी.
एके दिवशी श्रीरामनवमी उत्सवांत श्रीप्रतापसिंहराजे श्रीभीमस्वामी मठांत श्रीरामांचे दर्शनास गेले होते. त्यावेळी भीमस्वामींचे कीर्तन सुरु होते. काही विघ्नसंतोषी लोकांनी श्रीप्रतापसिंह महाराजांना आग्रह करून पुढील प्रश्न विचारावयास सांगितला. “स्वामी तुम्ही थोर रामभक्त आहात. तरी कीर्तन करून श्रीरामास प्रत्यक्ष कराल काय? (प्रत्यक्ष समोर प्रकट कराल काय)”
परिस्थिती जाणून श्रीभीमस्वामींनी श्रीसमर्थांचे स्मरण करून रामाचे ध्यान केले व “येई राम राया । नेई भवतम विलया” अशी रामरायाची आर्त विनवणी करणारे पद कीर्तनात गाण्यास सुरुवात केली. सवेंच मठांत श्रीरामासंनिध ज्योतिमय प्रकाश उत्पन्न होऊन श्रीरामाचा मंडप (देव्हारा) दोन हात पुढे सरकून आला! प्रतापसिंह राजे व सभेतील सर्व मंडळी या घटनेने आश्चर्यमुग्ध होऊन रामाच्या ध्यानात विमग्न झाले!पुढे महाराजांनी भीमस्वामींकडे क्षमायाचना केली. ह्या घटनेचा उल्लेख श्रीभीमस्वामींचे चरित्रात येतो.
चाले वृत्त: मिळोनि साधु सत्वरीं। तयासी भोजनोत्तरीं।पुसे कसें बसे घरी। असोनी देव अंतरी।
विचार थोर यापरी। करोनियां परोपरी।प्रजा निजार्थ अंतरी। घरी सुभक्ति त्यावरी॥३१॥
आर्या: प्रार्थिती शिष्य तयाशीं एके दिवसी कथा करायासी।पाहुनि रघुवर यांशी गाति भक्ति कडुनि रामासी ॥३२॥
पद: येई रामराया नेई भवतम विलया...॥३३॥
श्लोक: गड गड रथ आला राघवाचा समोरी।निरखुनी जन त्यांची मानिती भक्ति भारी।
बहुविद महिमेतें दाविले या प्रकारी।श्रवण जगीं तयाचे सर्व पापें निवारी॥३४॥
आर्या: पाउनि खेद मनासी निंदुमि निर्बंधकारी शिष्यासी।निगमाद्यगोचराशी म्हणती अपराधी जाहलो यासे॥३५॥
या प्रसंगानंतर श्रीप्रतापसिंह राजांनी आपणास मंत्रोपदेश करण्याचे विनंती श्री भीमस्वामींस केली. श्री भीमस्वामींनी राजांना मन्नरगुडी येथील अनंतमौनी मठाचे परंपरेतील श्रीमेरुस्वामींचे शिष्य श्रीसेतुस्वामींकडे मंत्रोपदेश घेण्याची आज्ञा केली. त्यांचे आज्ञेप्रमाणे श्री महाराजांनी श्रीसेतुस्वामींकडे जाऊन मंत्रोपदेश घेतला. (सदर घटनेचे पत्रव्यवहार तंजावर येथे सुरक्षित आहेत, व अस्सल कागदपत्रे प्रकाशित आहेत)
आपल्या सद्गुरुंचा गौरव करावा या हेतूने श्रीप्रतापसिंह महाराजांनी तंजावरातील आपल्या राजवाड्यासमोर श्रीस्वामींस एक प्रचंड मोठा मठ निर्माण करून देऊन, श्रीसीताराम प्रभुंचे नित्य पूजा उत्सवासाठीं काहीं भूमीही दानशासन करून दिली आणि श्रीस्वामीचे विशेष आराधनेसाठी एक मारुतीचे मंदिर पश्चिम राजरस्त्यावर बांधून देऊन त्या मारुतीस “प्रतापवीर हनुमान” असे नाव दिले.आजही तो त्याच नावाने प्रसिद्ध आहे. तसेच श्रीरामाचे मंदीरही निर्माण केले व त्याचे “प्रतापराम” असेनामकरण केले व आपला या रामाशी व रामदासी सांप्रदायाशी असलेला ऋणानुबंध कायमचा रहावा व सर्व जगतांस ज्ञात व्हावा या हेतूने आपल्या राजमुद्रेत “श्रीरामप्रताप” अशी अक्षरेही श्रीप्रतापसिंहराजेंनी कोरून घेतली.
श्रीसेतूस्वामींकडे अनुग्रह घेतल्यामुळे महाराज श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले स्वतः रामदासी झाले. महाराजांनी स्वतः मराठी भाषेत एकुण वीस नाटके लिहिली. स्वतः रामदासी असल्याने त्यांच्या प्रत्येक नाटकास प्रभु रामचंद्रांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून ती सर्व नाटके प्रथम रामनवमी उत्सवात सादर केली जात.
तसा उल्लेख त्यांच्या “प्रबोध चंद्रोदय” या नाटकाच्या पहिल्या अंकाच्या शेवटच्या पानावर आहे. यातील तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात सध्या १७ नाटके उपलब्ध आहेत. १) सीताकल्याण २) उषाकल्याण ३) पार्वतीकल्याण ४)मित्रविंदा परिणय ५)मायावती परिणय ६) प्रभावती परिणय ७)रुक्मिणी कल्याण ८) धृव चरित्र ९)ययातीचरित्र १०) रुक्मांगद चरित्र ११) पारिजातापहरण १२) जानकीसुखोल्हास १३) श्रीकृष्णजनन १४) अनसूया उपाख्यान १५) स्यमंतकोपाख्यान १६) प्रबोधचंद्रोदय १७) लक्ष्मणपरिणय इ.
तंजावर श्री भीमस्वामी कॄत पद
१)रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे - मना रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे ॥धॄ॥
घडि घडि घडि प्रेम सुखानंदे - आनंदे गांइरे॥ मना रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे ॥धॄ॥
गौरतनु कार्मुकशर - सगुण ठाण ठमके ॥ मुरली शंख चक्र - नीलवपु झमके ॥१॥
मुकुट कुंडलादीरक्त पद्मनयन दोघां ॥ जेवीं शोभा स्शोभे उभय वोघां ॥२॥
मोतियाचे हार भार फार गळां साजे ॥ जडित पदक मणि कौस्तुभ विराजे ॥३॥
रघुवीर मुखे बिंब जसा पूर्णीमेचा इंदू ॥ वदन मदन मनोहर हा गोविंदू ॥४॥
म्हणतसे भीमराज काज - त्यजुनी शरणजाईं ॥ येक भावेंचि ठाव करीं पांईंरे ॥५॥
२)ध्याई मना तू रे ॥ विठोबाला ध्याई मना तू रे ॥ धृ ॥
देहत्र्यावरीं । चन्द्रभागा तिरीं । बोद इटेवरीं । विराजितो हरीं ॥ १ ॥
समपद सुकुमार । कासे पीतांबर । गळा योग हार । शोभे कठीकर ॥ २ ॥
देये विण ध्यान । ध्येहे विण ज्ञान । तेहे रूप पूर्ण । चिन्मये चिद्घन ॥ ३ ॥
बोले भीमराजें । येकभावें भज ।भजुनियांबुज । स्वानंदाचे गुज ॥ ४ ॥
दिनकर स्वामी
दिनकर स्वामी अहमदनगर जवळील तिसगाव मठाचे मठपती होत.त्यांनी 'स्वानुभव दिनकर ' नावाचा ग्रंथ लिहिला .
नगर जिल्ह्यात भिंगर येथे दिवाकर पथक नावाचा तरुण साधक होता.त्याचे लग्न झाले होते.त्याला मुले-बाळे होती.तथापि त्याचे संसारात फार लक्ष नव्हते.तासंतास तो ध्यान-धारणा करीत असे.अनेकदा घरातील वस्तू गोर-गरीबांना देऊन टाकी.त्यामुळे त्याचे आईशी आणि पत्नीशी कधी पटले नाही.एक दिवस संसारातील कटकटीना कंटाळून त्याने घर सोडले आणि तिसगाव जवळच्या वृद्धेश्वराच्या डोंगरात सिद्धेश्वर मंदिरात त्याने अनुष्ठान सुरु केले.एक दिवस त्याला पाहते स्वप्न पडले.स्वप्नात भगवे वस्त्र परिधान केलेला एक तेजस्वी साधू आला आणि त्याने दिवाकरला स्वप्नात अनुग्रह दिला.या घटनेनंतर दिवाकर इतका व्याकूळ झाला की स्वप्नात दिसलेला साधू प्रत्यक्ष भेटल्या खेरीज अन्न ग्रहण करावयाचे नाही, असे त्याने ठरविलेतीन दिवस तो उपाशी होता.सारंगपूरहून समर्थ तीसगावजवळ सिद्धेश्वर मंदिरात आले. समर्थांना पाहताच दिवाकरने ओळखले, की आपल्याला स्वप्नात अनुग्रह देणारा महात्मा हाच. समर्थांनीदेखील दिवाकरला ओळखले. प्रथम भेटीतच त्यांनी त्याल अनुग्रह दिला.दिवाकर सुर्योपासक असल्याने समर्थांनी त्याचे दिनकर ठेवलं. तीसगावला मठ स्थापन करून त्याला तेथील मठपती केले.एवढेच नव्हे तर समर्थांनी त्याला बायका-मुलांचा सांभाळ करायला सांगितलं.त्याने भिंगारपुरहून आपले कुटुंब तीसगावला आणले. 'आधी प्रपंच करावा नेटका | मग घ्यावे परमार्थविवेका |' ही समर्थांची शिकवण दिनकर स्वामींनी आचरणात आणली. याच दिनकर स्वामींनी समर्थांच्या निर्वाणानंतर १२ वर्षांनी म्हणजेच १६९४ साली 'स्वानुभव दिनकर' नावाचा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला
तसेच त्यांनी रामदासस्वामी वर श्रीराम करुणा नावाचा ग्रंथ लिहिला .[१]
केशवस्वामी
त्यांचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. आईचे नाव गंगाबाई. गंगाबाईंना म्हातारपणी हे अपत्य झाले. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. केशवस्वामी पाच वर्षाचे असेपर्यंत बोलत नव्हते. त्यावेळी जे कोणी शंकराचार्य पीठावर होते, त्यांचे एकदा कल्याणी गावी आगमन झाले. त्यांनी छोट्या केशवला कृपाप्रसाद दिला आणि त्याला वाचा आली, असे सांगितले जाते.
केशवस्वामी विवाहित होते, प्रापंचिक होते. ते आध्यात्मिक विचाराचे होते, पण विषयोपभोगाचे त्यांना वावडे नव्हते. अध्यात्मपर विचार शृंगारिक काव्यात ते अशा बेमालूमपणे मिसळून देत के त्यांच्या काव्याने लोक थक्क होत.
आख्यायिकासंपादन करा
केशवस्वामींना लोक गीतगोविंदकर्त्या जयदेवाचा अवतारमानीत. त्यांच्या कीर्तनाने प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्रसन्न होई. त्यांच्या कीर्तनादरम्यान एकदा भिंतीवरील कृष्णाच्याचित्रातील राधेने दिलेला विडा चित्रातीलच श्रीकृष्णानेस्वीकारला आणि भक्षण केला, अशी आख्यायिका आहे. केशवस्वामींनी दाखवलेल्या चमत्कारांमुळे अनेक यवनअधिकारी आश्चर्यचकित होत असत. एकदा केशवस्वामींच्या कीर्तनात सुंठवड्यात चुकून बचनाग मिसळला गेला, पण कुणालाही विषबाधा झाली नाही. श्रीकृष्णाची मूर्ती मात्र काळवंडली. समर्थांच्या भेटीसाठी केशवस्वामी एकदा फार व्याकुळ झाले; पत्नीसह सज्जनगडाला निघाले. पति-पत्नी दोघांचेही वय झाले होते. ्डोंगर चहताना दोघेही थकून गेले. एका अनोळखी माणसाने त्यांचे सामा्न तर उचललेच, पण केशवस्वामींच्या पत्नीलाही खांद्यावर बसवून गडावर नेण्याची तयारी दाखवली. बाई संकोचाने नाही म्हणाल्या, पण केशवस्वामी म्हणाले, ‘संकोचू नकोस, तो आपला बाळच आहे’. गडावर पोहोचल्यावर बाई त्याला शोधू लागल्या, पण तो कोठे दिसे ना. तेव्हा केशवस्वामी म्हणाले, ‘तोआपला बाळ नव्हता, अंजनीचा बाळ होता.’
भागानगरसंपादन करा
पुढे केशवस्वामी भागानगरला गेले आणि त्यांनी तेथे स्वतःचा मठ स्थापन केला. समर्थ संप्रदाय्वाढवला. त्या मठात समर्थ पंचायतनातले इतर सत्पुरुष जात-येत असत. केशवस्वामींना समर्थ रामदासांच्या वागण्याचे मोठे कौतुक असे. समर्थांवर त्यांनी अनेक पदे रचली आहेत. ते म्हणतात :-
- सच्चिद्सुखघन वरद प्रतापी |
- शांतीची साउली |
- रामदास माउली ||
या केशवस्वामींची समाधी हैदराबाद येथे आहे. हे केशवस्वामी समर्थ पंचायतनातले एक आहेत.
दुसरे केशव स्वामी?संपादन करा
उंब्रज मठपती केशवस्वामी हे कल्याण स्वामींचे शिष्य होते.
ते इ.सन १६८२ ते १७१४ पर्यंत चाफळ येथे समर्थांच्या अस्थी असलेल्या वृंदावनाची व्यवस्था पाहत होते. त्यांनीच समर्थ रामदास व कल्याण स्वामी यांच्या अस्थींचे विसर्जन गंगेमध्ये केले. त्यांचा हस्तलिखित सोनेरी रंगाचा दासबोधआजही डोमगाव मठात पहाण्यास मिळतो. त्यांनी चाफळयेथील नदीला घाट बांधल्याचा उल्लेख समर्थप्रताप ग्रंथामध्ये आहे .
- हणमंत स्वामी
- रघुनाथ स्वामी
- रंगनाथ स्वामी
रंगनाथस्वामी निगडीकर
रंगनाथस्वामी निगडीकर(जन्म-१६१२; मृत्यू-१६८४) हे समर्थ पंचायनातले एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा शिवाजी महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतू काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे.
![]() | कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यासमदत करा. |
पूर्वायुष्यसंपादन करा
रंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी देशपांडे. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे नाझरे गावचे देशपांडे होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत. कल्याणी गावचे पूर्णानंद हे सहजानंदांचे शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदांकडून अनुग्रह झाला. पुढे निजानंदांनी शके १५६४मध्ये मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी कऱ्हाड येथे जिवंत जलसमाधी घेतली.
संन्यासी झालेले रंगनाथस्वामी शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहिले. घोड्यावरून तीर्थयात्रा करताना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील निगडी गावाजवळ एका ओढ्याकाठी त्यांच्या घोड्याचा खूर दगडात रुतला, म्हणून ते घोड्यावरून खाली उतरले आणि दैवी संकेत समजून निगडीत राहू लागले.
लेखनसंपादन करा
रंगनाथस्वामींची लेखनशैली आणि निरूपणशैली ही रामदासांसारखी सुस्पष्ट आणि रोखठोक आहे. त्यांनी हजारो पदे, पंचके आणि अष्टके लिहिली. समर्थ रामदासांचे वर्णन त्यांनी ‘राजाधिराज अवतरला हा या जगदोद्धारा’ या शब्दांत केले आहे. कल्याणस्वामी यांना फार अद्वैतचर्चा केलेली आवडत नसे. त्यांनी रंगनाथस्वामींना ‘अद्वैतचर्चा कंटाळवाणी सांडूनि वर्णा कोदंडपाणी’ (अद्वैतावर चर्चा करण्यापेक्षा श्रीरामाची उपासना करा) असा सल्ला दिला. त्यावर रंगनाथस्वामींनी ‘अद्वैतचर्चा जंव हे कळेना, तो पूर्ण रामीं मन हे वळेना’ असे जोरदार उत्तर दिले.
धाडसी रंगनाथस्वामीसंपादन करा
माघातील रामदासांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी रंगनाथस्वामींनी वडगावी येण्याचे जयरामस्वामींना कबूल केले होते, पण ही गोष्ट ते विसरून गेले. त्यावेळी ते भागानगरला होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्यांना ते आठवले. त्वरित त्यांनी घोडा दौडवला. वाटेत झालेल्या रामोश्यांच्या हल्ल्याचा त्यांनी न घाबरता प्रतिकार केला आणि सायंकाळी ते वडगावला पोचले. त्यांच्या या धाडसाचे साऱ्यांनीच आश्चर्यमिश्रित कौतुक केले.
शके १६०६च्या मार्गशीर्ष वद्य दशमीला रविवारी रंगनाथस्वामींनी देहत्याग केला (इसविसन १६८४). त्यांची समाधी निगडी येथे आहे.
हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप आदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय ग्रंथांचे कर्ते श्रीधर हे या रंगनाथस्वामींचे पुतणे होत.
- भोळाराम
- वेणा बाई
वेणाबाई
वेणाबाई (अंदाजे इ.स. १६२७-२८ - चैत्र वद्य चतुर्दशी शके १६००, इ.स.१६७८ (समाधी )) या मराठी संत होत्या.
बालपण
१६ व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी वेगळ्याच हेतूने आपले कार्य सुरु केले होते. सर्व समाज त्यांना संघटीत करावयाचा होता. धर्मसंघटनेची उभारणी त्यांनी सुरु केली त्यावेळी मिरजेला त्यांची वेणाबाईंशी पहिली भेट झाली. वेणाबाई या ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या बालविधवा होत्या. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे यांच्या वेनाताई मुलगी होत्या. वलहानवयातच लग्न होऊन त्या मिरजेला सासरी गेल्या. दुर्देवनी पतीचे निधन लवकर झाल्याने बालविधवीचे जीवन जगणे त्यांच्या नशिबी आले. त्या काळात विधवा स्त्रीने घरकाम करीत, देवाचे नाव घेत, धर्मग्रंथांचे धार्मिक ग्रंथांचे वाचन करीत आपले जीवन कंठायचे, अशी रीतच होती. समर्थ रामदास स्वामी त्याच्या घरी भिक्षा मागायला आले तेव्हा समर्थांचे त्यांना प्रथम ओझरते दर्शन झाले. काही दिवसांनी रामदास स्वामी पुन्हा त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आले. तेव्हा वेणाबाई तुळशी वृन्दावानापाशी एकनाथी भागवत वाचीत होत्या.समर्थांनी विचारले ”मुली तुला यातले समजते का काही?” त्यावर वेणाबाईंनी समर्थांना पंचवी प्रश्न विचारले त्या प्रश्नातून समर्थांना वेनाबाईंची. ही भेट वेणाबईंच्या जीवनाचा रस्ता बदलणारी ठरली. रामदास स्वामींच्या भेटीचा,बोलण्याचा वेणाबईंच्या मनावर खूप परिणाम झाला. हेच आपले गुरु आहेत. त्यांच्याकडून उपदेश घ्यावा. त्यांची सेवा करीत जीवन घालवावे. अये त्यांना वाटू लागले. रात्रंदिवस वेणाबाई त्यांचाच विचार करीत देह माझे मन माझे|सर्व नेले गुरुराजे अशी त्यांची अवस्था झाली. वेणाबाईंना कोल्हापूरला पाठवून दिले.[१]
व्यतिगत माहितीसंपादन करा
या मूळच्या कोल्हापूर येथील राधिकाबाई आणि गोपजीपंत गोसावी यांच्या कन्या होत्या. विवाहानंतर त्या मिरज येथील देशपांडे यांच्या घरी गेल्या. काही काळातच, वयाच्या बाराव्या वर्षी विधवा झाल्या. तेथेच त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले. नंतर त्या मिरज येथे परत आल्या. समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जननिन्देला सामोरे जावे लागते. समर्थ त्याला अपवाद नव्हते. वेणाबाई, अक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले आणि मठपती बनवले.[२] समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात. तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत. वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात. त्यांचे आई-वडील समार्थांचेच अनुगृहीत होते. तर सासू-सासरे एकनाथ महाराजांचे अनुगृहीत होते. कोल्हापुरातील मंडळींची मजल तर वेणा बाईंना विषप्रयोग करण्यापर्यंत गेली. वेणा बाईंनी विष पचवून दाखवले. निन्दकांना पश्चात्ताप झाला. त्यांनी वेणाबाई आणि समर्थांची क्षमा मागितली. प्रारंभी कणखर मानाने जननिंदा सोसणाऱ्या वेणा बाईंनी कोमल अंतःकरणाने सर्वांना क्षमा केली.[३]समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. त्या काळात एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला चाफळात ठेऊन उत्सवाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात असे. एक वर्ष हि जबाबदारी वेणास्वामींच्यावर सोपविण्यात आली. उत्सवासाठी सगळ्या प्रकारची धान्ये निवडून ठेवणे, लोणची, चटण्या, सांडगे, पापड, मेतकुट या सर्व गोष्टी सिद्ध ठेवणे, समर्थांनी पाठवलेली भिक्षा कोठीघरात व्यवस्थित लावून ठेवणे अशी विविध कामे करावी लागत. ऐन उत्सवाच्या १५ दिवस आधी वेणाबाई आजारी पडल्या.त्या तापाने एवढ्या फणफणल्या की त्यांना चालताही येईना. राम-मंदिरातील खांबाला धरून मोठ्या मुश्किलीने त्यांनी रामाजवळ करून भाकली.वेणाबाईंची हि केविलवाणी अवस्था पाहून चाफळातील राममुर्तीच्या डोळ्यांत अश्रू आले आणि काय आश्चर्य! विठ्ठलाने ज्याप्रमाणे नाना रूपे धारण करून संत जनाबाई, संत एकनाथ, या संतांची सेवा केली त्याप्रमाणे रामचंद्रांनी रामबाईं च्या रुपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली. 'मी बत्तीस शिराळ्याची असून रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठविले आहे'. असे रामाबाईंनी वेणाबाईंना खोटेच सांगितले. समर्थ भिक्षेहून परतल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला. आणि रामाबाई ही गुप्त झाल्या. वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे.[४] सीतास्वयंवर वगैरे काही स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. सीतेचे स्वयंवर वेणाबाईंच्या पूर्वी आणि नंतर अनेकांनी वर्णिले आहे, पण वेणाबाईच्या ग्रंथाची योग्यता काही अनोखीच आहे. रामदासस्वामींनी इ.स.१६५६ मध्ये बांधून दिलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे. वेणाबाईंना आदराने वेणास्वामी असे म्हटले जाते .
वेणाबाईंची ग्रंथरचना :
- उपदेशरहस्य - रामायणी प्रकरण
- कौल - रामायणी प्रकरण, एकूण २६ श्लोक
- पंचीकरण - वेदान्तावरील गद्य टिप्पण्या
- रामगुहकसंवाद किंवा नावेचे श्लोक - रामायणी प्रकरण
- रामायणाची कांडे (फक्त पाच?) : आदि, अयोध्या, अरण्य, किष्किंधा व सुंदरकांड. एकूण दीड हजार श्लोक
- सिंहासन - रा्मायणी प्रकरण
- सीतास्वयंवर - एकूण चौदा समास, ओवीसंख्या १५६८
- स्फुट - अभंग पदे, वगैरे.[५]
संदर्भ .
- ^ कर्वे, स्वाती (2014). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २७. ISBN 978-81-7425-310-1.
- ^ Webdunia. "भक्तीनिष्ठ 'संत वेणाबाई'". marathi.webdunia.com (इंग्रजी भाषेत).2019-01-12 रोजी पाहिले.
- ^ कर्वे, स्वाती (२०१२). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. २७. ISBN 978-81-7425-310-1.
- ^ "वेणाबाई की गुरुनिष्ठा". Mahila Utthan Mandal - Sant Shri Asharam Ji Ashram(इंग्रजी भाषेत). 2019-01-12 रोजी पाहिले.
- ^ Gaikwad, Priyanka. "वेणाबाई |" (इंग्रजी भाषेत). 2019-01-12 रोजी पाहिले.
समर्थ वेणाबाई संवाद
नमू वागेश्वरी शारदा सुंदरी |श्रोता प्रश्न करी वक्तयासी ||१||
वक्तयासी पुसे जीव हा कवण |शिष्याचे लक्षण सांगा स्वामी ||२||
सांगा स्वामी आत्मा कैसा तो परमात्मा |बोलिजे अनात्मा तपो कवण ||३||
कवण प्रपंच कोणे केला संच |मागुता विसंच कोण करी ||४||
कोण ते अविद्या सांगिजे जी विद्या |कैसे आहे आद्याचे स्वरूप ||५||
स्वरूप ते माय कैची मूळमाया |ईस चाळावया कोण आहे ||६||
आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य |समाधान अन्य ते कवण ||७||
कवण जन्मला कोणा मृत्यू आला |बद्ध जाला तो कवण ||८||
कवण जाणता कोणाची ही सत्ता |मोक्ष हा तत्वता कोण सांगा ||९||
सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण |पंचवीस प्रेष्ण ऐसे केले ||१०||
वरील २५ प्रश्न वेण्णाबाईंनी समर्थांना विचारले व त्यांची उत्तरे समर्थांनी दिली टी अशी :
नमू वेदमाता नमू त्या अनंता |प्रश्न सांगो आता श्रोतयाचे ||१||
श्रोतयाचे प्रश्न जीव हा अज्ञान |जया सर्व ज्ञान तोचि शिव ||२||
शिवपार आत्मा त्यापर परमात्मा|बोलिजे अनात्मा अनुर्वाच्य ||३||
वाच्य हा प्रपंच माईक जाणावा |घडामोडी देवापासूनिया ||४||
विषय अविद्या त्यालावी ते त्या विद्या |निर्विकल्प आद्याचे स्वरूप ||५||
कल्पना हे माया तत्व मूळमाया |यासी चाळाया चैतन्यापरी ||६||
नकार ते शून्य व्यापक चैतन्य |ईश्वर अनन्य समाधान ||७||
जीव हा जन्मला जीवा मृत्यू आला |बद्धमुक्त झाला तोचि जीव ||८||
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता |मोक्ष हा तत्वता ईश्वरची ||९||
ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण |हेची ब्रह्मखूण दास म्हणे ||१०|||
दास म्हणे सर्व मायेचे करणे |मिथ्यारूपे जाणे अनुभवे||११||
आक्काबाई
अक्काबाईंनी ३५ वर्षे समर्थांच्या हयातीत चाफळचा कारभार सांभाळला शिवाय समर्थांच्या पश्चात ३८ वर्षे सज्जन्गाडचा कारभार सांभाळला. १२ व्या वर्षापासून ८५ वर्षांपर्यंत रामरायाची सेवा करून त्या कृतार्थ झाल्या.औरंगजेबाच्या आक्रमणाच्यावेळी अक्काबाई यांनी गडावरील राम पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली. त्यांची समाधी सज्जनगडावर आहे. त्यांना अक्कास्वामी असे म्हटले जाई.
समर्थ रामदास संप्रदायातील स्त्रिया
अंबिकाबाई ह्या राशिवडे येथील समर्थ संप्रदायाच्या मठाच्या प्रमुख आहेत/होत्या.
अनंतबुवा मेथवडेकर
![]() | हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. |
शके 1571 मध्ये पंढरपूर हून परत जाताना श्री समर्थांचा मुक्काम मेथवडे येथे माण नदीमध्ये असलेल्या मांडवखडक या खडकावर होता. भिक्षा मागून परतणाऱ्या शिष्यासोबत श्री अनंत बुवा कुलकर्णी मेथवडेकर श्री समर्थ दर्शनासाठी गेले. तेथे त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. श्री समर्थांना त्याच नदीत विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्ती मिळाल्या. मेथवडे मठ स्थापना करून त्या मूर्तींची स्थापना समर्थांच्या हस्ते झाली. समर्थ व वारकरी संप्रदाय समन्वयाची मुहूर्तमेढ समर्थांच्या हस्ते झाली. परंपरेने समर्थांचे प्रतिनिधी म्हणून मेथवडे मठातून आषाढी वारी पंढरपूर साठी सुरू झाली. पुढे श्री गोजीवनदास चौंडे महाराज व त्यांचे पुत्र श्री नानामहाराज चौंडे यांनी या वारीला दिंडीचे स्वरूप दिले. पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा ट्रस्ट कासारघाटावर स्थापन करून समर्थांनी दिलेल्या पादुका तेथे स्थापन झाल्या.
अनंतबुवा मेथवडेकर यांची समाधी सांगोला तालुक्यातील मेथवडेया गावी आहे मेथवडे हे ठिकाण सांगोले तालुक्यात असून पंढरपूर पासून मिरज मार्गावर 22 किमी. अंतरावर आहे. .श्री अनंत बुवा मेथवडेकर यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य ५ असते.या पादुकांना प.पू.श्री. श्रीधरस्वामी यांनी चांदीचा पत्रा लावून मढवून दिल्या. पंढरपूर च्या या मठातील श्री राम मूर्ती फार सुंदर आहेत. मेथवडे मठाच्या अधिपत्याखाली मंगळवेढा, आटपाडी व तिकोटा येथील मठ स्थापन झाले. दरवर्षी मेथवडे सज्जनगड अशी वारी नेतात.
==काव्य==
सुलोचना गहिवर, सुलोचना आख्यान, रामदास स्तुती. ,अभंग , पदे. , आरती असे लिखाण श्री अनंत बुवा मेथवडेकर रामदासी यांनी केले आहे.
दिवाकर स्वामी
वासुदेव स्वामी
मूळचे काशीचे प्रकांड पंडित असलेले सदाशिवशास्त्री येवलेकर शास्त्रार्थामध्ये विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आले होते .समर्थ रामदासांनी त्यांना शास्त्रार्थामध्ये पराभूत केल्यावर त्यांनी समर्थांचे शिष्यत्व स्वीकारले .हेच सदाशिवशास्त्री पुढे 'वासुदेव स्वामी' म्हणून प्रसिद्ध झाले.त्यांचा मठ व समाधी साताऱ्याजवळ 'कण्हेरी' येथे आहे .त्यांची पुण्यतिथी श्रावण शुद्ध तृतीया या दिवशी असते . काशी क्षेत्री सदाशिवशास्त्री येवलेकर या नावाचे विद्वान पंडित होते.त्यांचा वेद्शास्त्राचा गाढ अभ्यास होता.विद्वान म्हणून जसजशी त्यांची कीर्ती वाढू लागली,तसतसा त्यांच्या अहंकाराचा फुगा फुगू लागला.भारतभर हिंडून प्रत्येक प्रत्येक प्रांतातील विद्वान पंडितांशी वाद घालून जायपत्र मिळविण्याचा उद्योग त्यांनी सुरु केला.अर्ध्याहून अधिक भारत पादाक्रांत केल्यावर त्यांच्या अहंकाराला आणखीनच धार चढली.त्यांचा आत्मविश्वास वाढला.त्यांना एक आज्ञाधारक शिष्यही मिळाला. त्या शिष्याच्या हातात २४ तास जळती मशाल असायची.तसेच सदाशिवशास्त्री लोकांना याचा अर्थ काळात नसे.तेव्हा सदाशिवशास्त्री सांगत, ' ज्या दिवशी माझा वादात पराभव होईल, त्या दिवशी हि मशाल विझेल आणि या सुरीने मी माझी जीभ कापून घेईन'. लोकांना त्यांच्याबद्दल आदरापेक्षा भीतीच जास्त वाटू लागली.पण शास्त्रीजींचे काहीतरी पूर्वसुकृत होते म्हणून त्यांची सामार्थांशी गाठ पडली. समार्थांशी वाद घालण्याकरिता ते चाफळला आले.समर्थांनी त्यांना वादापासून परावृत्त करण्याचा खूप पर्यंत केला. शेवटी समर्थांनी शास्त्रीबुवांची चांगलीच जिरवली. रस्त्यावरून चाललेल्या मोळीविक्याला त्यांनी हक मारली. समर्थांच्या नुसत्या कृपादृष्टीने मोळविक्याचे रुपरंग पालटले.एखाद्या पंडिताचे तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागले.त्या सर्व प्रकाराने शास्त्रीजी गाड्बगले.मोळीविक्याने पूर्वपक्ष मांडून वादाला प्रारंभ केला.तेव्हा शास्त्रीबुवांनी आपला पराभव होणार हे ओळखले त्यांनी मशाल विझवली.सुरीने ते जीभ कापून घेणार तेवढ्यात समर्थांनी त्यांना आवरले.समर्थ म्हणाले - 'आपले ज्ञान इतरांना वाटून सगळा समाज ज्ञानी करावा. वाद घालून, तुम्ही तुमच्या ज्ञानाचा दुरुपयोग करीत आहात.'यानंतर शास्त्रीजींचे पूर्ण जीवन बदलले
गिरिधर स्वामी
समर्थसंप्रदायातील एक संतकवी.[१]
जन्म : निर्देश आढळत नाही
समाधि : इ.स.१७२९, शके १६५१.
समर्थसंप्रदायसंपादन करा
समर्थसंप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. या संप्रदायाची हस्तलिखितं मुख्यत्वेकरुन धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात उपलब्ध होतात. ती मिळविण्यासाठी समर्थ भक्त शंकरराव देव यांनी अपार परिश्रम केले. त्यामुळे हा मौलिक संग्रह आजवर टिकून राहिला.
गिरिधरस्वामींची गुरुपरंपरासंपादन करा
गिरिधर स्वामी हे समर्थकालीन संतकवी असावेत. त्यांना समर्थांचा सहवास लाभल्याविषयी महाराष्ट्रभाषा भूषण श्री. ज. र. आजगांवकर यांनी 'प्राचीन मराठी संतकवी' या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडात उल्लेख केला आहे. गिरिधरस्वामींची गुरुपरंपरा अशी सांगितली जाते -
समर्थ रामदास स्वामी
↓
वेणाबाई
↓
बायजाबाई (बयाबाई)
↓
गिरिधरस्वामी
गिरिधरस्वामींचं मूळ घराणं मिरज-तासगावकडील असून ते गुरुंच्या आज्ञेवरुन मराठवाड्यातील 'ईट' या गावी मठ स्थापून राहिले. त्यांच्या जन्मशकाचा निर्देश आढळत नाही. पण समर्थांचा सहवास लाभल्याचं त्यांनी 'समर्थप्रताप' या ग्रंथात त्यांनी निवेदिलं आहे. त्यांचा समाधि शक १६५१ म्हणजे इ.स.१७२९ असा आहे.
गिरिधरस्वामींचे लेखनसंपादन करा
गिरिधरस्वामींच्या लेखनावर समर्थ विचारांचा नि समर्थ -साहित्याचा फार मोठा प्रभाव आहे. त्यांचं लेखन अक्षरश: प्रचंड आहे. महानुभाव साहित्यिकात ग्रंथसंक्षेप करण्याची किंवा ग्रंथातील विषयाची सूची देणारी रचना करण्याची प्रवृत्ति होती, ती गिरिधरस्वामींमध्येही दिसते. त्यांच्या एकूण चाळीस रचनांपैकी श्रीग्रंथभावार्थ ग्रंथान्वय, श्रीदासबोधमहाराज भावार्थ हे ग्रंथ अशा प्रकारचे आहेत. सहा रचना गुरुशिष्यविषयक आहेत.
श्रीराम हे समर्थसंप्रदायाचे उपास्य दैवत. त्याविषयी काही रचना आहे. समर्थांनी रामायणाचं सुंदरकांड नि युद्धकांड लिहिलं तर गिरिधरस्वामींनी अद्वा, मंगळ, छंदो, सुंदर, संकेत इ. रामायणं लिहिली. ती पाहिली की मोरोपंतांच्या १०८ रामायणांचं स्मरण होतं.
समर्थसंप्रदायांत 'हनुमंनस्वामींच्या बखरी' सारखी बखर लेखनाची परंपरा होती. त्याप्रमाणे गिरिधरस्वामींनी 'हकीकतवाक' लिहिला आहे. 'समर्थप्रताप' हा त्यांचा समर्थचरित्रविषयक ग्रंथ. त्यांच्या श्लोक-पदादी स्फुट रचनेची संख्या सुमारे पंधराशे असावी.
रामोपासनेची सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही रुपं गिरिधरस्वामींच्या लेखनात आढळतात. आपण सगुण श्रीरामाची उपासना केली की, आपल्याला सर्वचराचरात रामच दिसतो. त्यामुळे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसल्याचं, म्हणजेच आपल्यामध्ये 'अद्वैत' असल्याचं, आपल्याला जाणवतं. हे सांगताना स्वामी म्हणतात -
दृढमनीं रामरूप हे धरिलें दृश्य हेसारिले कैसे पहा
पहा पहा आतां कल्पना संभ्रम राम राम राम राम जाला
राम जाला हा ब्रम्हगाळ हा सकळ येकेक प्रांजळ बोलूं आतां
बोलूं आता लोक मला दिसती राम सीतापती सर्व जाले
सगुणोपासना ही मूलत: निर्गुणोपासना आहे, हा विचार समर्थांच्या सगळ्याच लेखनात आपल्याला आढळतो तयाचं प्रतिबिंब गिरिधरस्वामींच्या लेखनातही उमटलं आहे. त्यांनी आपल्या 'श्रीरामसूद' या ग्रंथात अशा प्रकारचं विवेचन केलेलं आहे. भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग याप्रमाणंच ज्ञानाचंही महत्त्व लक्षात घेऊन आपण ज्ञानमार्ग कसा स्वीकारावा याविषयी गिरिधरस्वामींनी 'आत्मानुभव' या ग्रंथात पुढील विवेचन केलं आहे -
येकांता वनीउपवनीं एकांत भुवनी ब्रम्हभुवनीं
गुरुदेव सदनी परमात्मसदनी अध्यापन ग्रंथ पहावे
नाना सुमन वाटिका आरामे देवदेवालये एकांत धामें
श्रवण मनन पूर्णकामे अध्यात्म ग्रंथ वाचावे
नाना परोपकाराकारणे सद्गुरुनाथें केले धांवणें
वेदशास्त्रसंमत वचने अध्यात्मग्रंथ विवरावे
हे तिन्ही मार्ग एकारलेले नसावेत तर ते परस्परपूरक असावेत, अशी स्वामींची धारणा आहे.
समाजाच्या विविध स्तरांतील लोकजीवनांचा अत्यंत सूक्ष्म निरीक्षण स्वामींच्या 'लोकस्वभाव' या ग्रंथात प्रकट झाला आहे. त्यातून कुठलाही वर्ण श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो व कोणत्याही वर्णाच्या लोकांनी एकमेकांना दोष न देता सामंजस्यानं सहजीवन व्यतीत करावं अशा प्रकारचं प्रतिपादन स्वामींनी केलं आहे -
जो जो प्राणी जन्मासी आला तो तो देहाभिमानेंचि गेला
त्यामध्ये कोणी विरळा प्रबोध निवळा निवळला
जो तो म्हणे 'आम्ही थोर' कोण पाहे सारासार ?
माझी वर्तणूक परपार पाववी भवाच्या
परपार हेहि नाही मीच अवघा सर्व कांही
साधुसंत कैचें काई कोठून आले?
शुद निंदिती ब्राम्हणास ब्राम्हण निंदिती आणिकास
परस्परे यातीपातीस थोरपणे उडविती
संदर्भसंपादन करा
- ^ "गिरिधर स्वामी : लेखक - डॉ.यू.म.पठाण". Archived from the original on २६ जुलै २०१४.
बाह्य दुवेसंपादन करा
- [ ]
- [ ]
- [ ]
अनंत कवी
- समर्थ स्तवनाचे अनंत कवी हे महाबळेश्वरचे होते. त्यांनी समर्थ रामदासांवर अनेक काव्यरचना केल्या आहेत. हे आणि अनंतबुवा मेथवडेकर एकच व्यक्ती आहेत का ? याची माहिती जाणकारांची चर्चा पानावर द्यावी.
विसाव्या शतकातील श्रेष्ठ समर्थ सांप्रदायिक
- श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
- श्री. शंकर श्रीकृष्ण देव
- श्री अनंतदास रामदासी
- श्रीधर स्वामी
- श्री मसुरकर महाराज
- श्री अण्णाबुवा कालगावकर
- प्रा. के. वि. बेलसरे
- नानासाहेब धर्माधिकारी
- ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
Comments
Post a Comment