रामराजा (१७२६-१७७७)

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रामराजा (१७२६-१७७७) - शिवाजीच्या वंशांतील सातारचा राजा. सातारकर छत्रपति पहिल्या राजारामाचा नातू. बापाचें नांव शिवाजी (२ रा) व आईचें नांव भवानीबाई. शिवाजी दुसरा १७२६ च्या मार्चांत वारला. त्यापूर्वी थोडे दिवस रामराज जन्मला. त्याची पहिली २-३ वर्षें पन्हाळ्यावरच गेलीं. त्याचा चुलता संभाजी व चुलती जिजाबाई यांनीं त्याचा जीव घेण्याचा प्रयत्‍न केल्यामुळें त्याची आजी ताराबाई हिनें बावडा येथें त्याला पळवून लाविलें. तेथें पंतअमात्याच्या देखरेखीखाली त्यानें १५-१६ वर्षें काढलीं. १७४५ च्या सुमारास तुळजापुरावरून त्या पानगांवास त्याच्या मावशीकडे पाठविलें. तेथें तो शाहूच्या मृत्यूपर्यंत होता. शाहूची राणी सकवारबाई हिच्या मनांत नागपूरकर मुधोजी भोंसल्यास दत्तक घेण्याचें होतें. त्यामुळें तिनेंहि रामराजाच्या नाशाची खटपट केली. परंतु शाहूची इच्छा रामराजासच आपल्या पश्चात गादीवर बसविण्याची होती. त्याप्रमाणे त्यानें नानासाहेब पेशव्यांस आज्ञा केली असल्यानें नानासाहेबानें अनेक खटपटी करून रामराजास ता.४-१-१७५० रोजीं गादीवर बसविलें. त्यावेळीं ताराबाईनें रामराजाला आपल्या ताटांत जेवावयाला घेऊन तो आपला नातू असल्याबद्दल लोकांची खात्री पटविली. रामराजा स्वभावाचा दुर्बल व शांत वृत्तीचा असल्यानें आणि खुद्द शाहूनेंच आपल्या मृत्यूपत्रानें सर्व मराठे साम्राज्य पेशव्यांच्या हाती सोंपविल्यानें यापुढील काळांत रामराजा व सातारचे इतर राजे यांची कांहीच कर्तबगारी दिसून येत नाहीं. यमाजी शिवदेवाचें बंड मोडण्यासाठीं स्वत: सदाशिवराव भाऊ सांगोल्यास गेले असतां त्यानीं रामराजास आपल्याबरोबर नेलें होतें (आक्टोबर१७५०). त्यावेळी रामराजानें पेशव्यांस जो करार करून दिला होता, त्यांतहि त्यानें राज्याचा सर्व कारभार पेशव्यांवर सोंपवून दिला. पेशव्यानीं त्याला दरसाल ६५ लक्षांची नेमणूक करून दिली. ताराबाई ही उलाढाली असल्यामुळें आपल्या हांतून पेशव्यांनी घेतलेला कारभार आपल्याकडे घेण्यासाठी तिनें अनेक खटपटी केल्या व एका खटपटीत तिनें रामराजालाहि आपल्या बाजूस वळविण्याचा प्रयत्‍न केला परंतु तो वळत नाहीं असें पाहून तिनें त्याला भेटीस किल्ल्यावर बोलावून कैद केलें. रामराजाची ही कैद २४-११-१७५० ते २८-३-१७६३ पर्यंत होती. यावेळीं ताराबाईनें हा राजा खोटा आहे असें सर्वत्र उठविले व तिनें रामराजाचा अत्यंत छळ केला. १७५५ साली ताराबाई पुण्यात आली असतां पेशव्यानी रामराजास सोडविण्याबद्दल तिची मनधरणी केली परंतु तिनें ऐकलें नाही. याप्रमाणें रामराजाला सोडविण्याचा प्रयत्‍न पेशव्यानीं अनेक वेळां केला परंतु ताराबाईच्या हयातीपर्यंत त्यांस यश आलें नाहीं. राज्यकारभार जरी पेशवे अखत्यारीनें करीत असत तरी विशेषप्रसंगी रामराजास त्या त्या कारभाराची माहिती कळवीत असत. भालकी येथें निजामाचा पेशव्यानीं पराभव केलेला ऐकून रामराजानें त्यांनां एक शाबासकीचें पत्र धाडलें आहे (१७५० डिसेंबर). ताराबाई वारल्यावर (१७६१ डिसेंबर) पेशव्यानीं रामराजास पुष्कळ मोकळीक दिली. आणि १७६३ सालीं थोरल्या माधवरावानीं त्यास आणखीहि स्वतंत्रता दिली. माधवराव पेशवे हे रामराजाची व्यवस्था सढळ हातानें करीत असत. रामराजाच्या बागा, हुजरे, वाडे, कलावंतीणी, वगैरे सर्वांचे खर्च पेशव्यानीं भरपूर रीतीनें चालविले होते. रामराजास दुर्गाबाई व सगुणाबाई अशा दोन बायका होत्या, त्या प्रत्येकीस आठ आठ हजारांची नेमणूक पेशव्यानीं करून दिली होती. रामराजास पुत्र झाला नाही, तीन कन्या होत्या. त्यांनांहि पेशव्यांनी नेमणुका बांधून दिल्या होत्या. यापुढें रामराजाचें काम म्हणजे निरनिराळ्या पेशव्यांस वस्त्रें देंणें व ऐषआरामांत स्वत: राहणें येवढेंच उरलें होतें. अशा स्थितींत तो सातारा येथें १७७७ साली वारला. त्याच्या पश्चात त्याची राणी सगुणाबाई हिच्या मांडीवर वावीकर भोंसल्यांपैकीं विठोजी यास सवाईमाधवराव व नाना फडणवीस यांनी दत्तक देऊन त्याचें नांव धाकटे शाहुमहाराज असें ठेवलें. (-डफ; मराठी दफ्तर, रू.१; राजवाडे खं. ८; पेशव्यांची बखर; म. रि. वि.३-४)-

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

Varāhamihira

महान सम्राट कृष्णदेव राय