नूरुद्दीन महमूद (१११७-११७३)- अत्यंत प्रख्यात व शूर असा सीरियाचा अताबक्षवंशीय मुसुलमान राजा.

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ 
           
नूरुद्दीन महमूद (१११७-११७३)- उर्फ मलिक-उल्अदिल, ख्रिस्ती धर्मयुद्धकालीन एक अत्यंत प्रख्यात व शूर असा सीरियाचा अताबक्षवंशीय मुसुलमान राजा. हा स. ११४६ त गादीवर आला. याचा वडील भाऊ सैफुद्दीन व हा, यांनीं सीरियाचा प्राचीन राजवंशांतील राजपुत्र अल्पअर्सलान याचा पराभव करून तो सर्व प्रांत काबीज केला. नूरच्या बापानें पॅलेस्टाईनमधील लॅटिन ख्रिस्त्यांच्या विरुद्ध जें धर्मयुद्ध पुकारलें होतें, तेंच पुढें चालविण्यांत नूरचीं पहिली वर्षे गेलीं. यानें एडेसा येथें कैद केलेल्या ख्रिस्त्यांची निदर्यपणें कत्तल केली व तें शहर बचिराख करून टाकिलें. हें शहर परत घेण्याकरितां फ्रान्सचा राजा सातवा लुई याच्या हाताखालीं यूरोपीय लोकांनीं दुसरें धर्मयुद्ध सुरू केलें (११४८). परंतु नूरनें व त्याच्या सेल्जुक तुर्कांनीं इंग्रजांचा धुव्वा उडवून दिला. एडेसा मुसुलमानांच्याच हातांत राहिलें व दमास्कसच्या वेढ्यांत तिसर्‍या बाल्डविनचा व यूरोपीयनांचा पुरा मोड (त्यांच्या आपसांतील मत्सरानें) झाला. त्यामुळें नूरची सत्ता जास्त वाढली. त्यानें अँटिओकच्या रेमंडला लढाईंत ठार करून तें राज्य खालसा केलें (११४९) व जेरुसलेमचा व एडेसाचा राजा जोसेलाईन कोर्टने यास पकडून कैदेंत टाकिलें आणि तेबलशेर, रावेनडेन वगैरे त्याच्या राज्याचा बहुतेक भाग जिंकून घेतला. पुढें बाल्डविननें दमास्कसचा राजा मुजीरुद्दीन याचा पराभव केल्यानें तेथील प्रधानमंडळानें मुजीरास पदच्युत करून तो सर्व प्रांत नूरच्या हवालीं केला (११५४). त्यानें दमास्कस ही राजधानी करून पॅलेस्टाईनचा भोंवतालचा सर्व प्रांत व ईजिप्तच्या फातिमाइट सरहद्दीपर्यंतचा प्रांत हस्तगत करून राज्यांत सुधारणा करून मशिदी, विद्यालयें, दवाखाने, पाणपोया वगैरे सुरू केल्या; नंतर त्यानें ईजिप्तहि खालसा केला. नूरचा प्रबल शत्रू बाल्डविन स. ११६२ त मेला. मेसापोटेमियावर नूरचा पुतण्या सुभेदार होता. नूर आतां जवळ जवळ ईजिप्तचाहि राजा झाला. त्याचें नांव बगदादच्या खलिफासारखें खुत्ब्यांत व खुद्द मक्का-मदिना येथील प्रार्थनेंत येऊं लागलें. त्याचा सेनापति सालहउद्दीन हा यापुढें हळू हळू स्वतंत्र बनूं लागला व त्यानें ईजिप्त आपल्या काबूंत घेण्यास प्रारंभ केला; तेव्हां त्याच्यावर स्वारी करण्याकरितां तयारी करीत असतां नूरुद्दीन हा एकाएकीं मरण पावला (११७३). त्याच्या मागून त्याचा लहान मुलगा मलिकउस् सालह इस्माइल हा गादीवर आला पण तो अज्ञान व दुर्बळ असल्यानें सालहउद्दीननें ईजिप्त व दमास्कासच्या राज्याचा बहुतेक प्रांत जिंकून घेतला. [बील]

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

Varāhamihira

महान सम्राट कृष्णदेव राय