सुरजमल्ल— भरतपूरचा जाट राजा.
विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद
सुरजमल्ल— भरतपूरचा जाट राजा. हा इ. स. १७५० मध्यें गादीवर आला. १७५१ साली सुरजमल्ल जाटानें अयोध्येचा नबाब, वजीर सफदरजंग यास रोहिले लोकांचें पारिपत्य करण्याच्या कामांत मदत केली व १७५३-५४ त सफदरजंगास मोंगल बादशहाविरुद्ध मदत केली. या कृत्याबद्दल जाटाचें पारिपत्य करण्यासाठी बादशहानें मल्हारराव होळकर व शिंदे यांनां आपल्या मदतीस बोलाविलें होतें (१७५४). १७५४ त राघोबानें कुंभेरीला वेढा घातला. या वेढ्यांत मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव गोळी लागून पडल्यामुळें मल्हाररावानें जाटाचा शिरच्छेद करण्याची प्रतिज्ञा केली. जाट जयाप्पा शिंद्याच्या आड दडला; तेव्हां नाईलाजानें होळकरानें जाटाशीं सलोखा केला; व मराठ्यांचा जाटाशीं तह झाला.
इ. स. १७६० मध्यें अबदालीस अटकेपार घालविण्याकरितां सदाशिवराव भाऊ हिंदुस्थानांत आला तेव्हा तीस हजार फौज घेऊन सुरजमल्ल जाट त्यास येऊन मिळाला (१७६०). पायदळ, तोफखाना, कबिले व बुणगे यांनां मागेंच कोठें तरी किल्ल्यांत ठेवून मराठ्यांनीं अफगाणांशीं गनिमी काव्यानें लढावें अशी सुरजमल्लाची सल्ला होती; परंतु ती सदाशिवराव भाऊनें ऐकली नाहीं. शिवाय भाऊनें दिल्लीचें छत तोडलेलें जाटास आवडलें नाहीं. म्हणून तो मराठ्यांस सोडून निघून गेला (१७६०). तथापि त्यानें मराठे पानिपत येथें अडचणींत सांपडले असतां त्यांनां आपल्याकडून पैशाची मदत केली व पुढें पानिपतच्या युद्धांत मराठ्यांचा मोड होऊन त्यांच्या सैन्याची दुर्दशा झाली तेव्हां पळपुट्या लोकांचा त्यानें चांगला परामर्ष घेतला (१७६१). पानिपतच्या मोहिमेनंतर अबदाली कंदाहारास परत गेलासें पाहून सुरजमल्लानें बादशाही मुलूख घेण्यास आरंभ केला. व आग्रा शहरहि घेतलें. १७६३ सालीं नजीबखान रोहिल्यांशीं लढतांना तो कामास आला. याचा कारभारी रूपराम कटारी होता.
Comments
Post a Comment