पृथ्वीराज व जयचंद

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास

पृथ्वीराज व जयचंद - कनोजचें परिहार घराणें १०९० त दुर्बल होऊन चंदेल्लांपैकीं गढवाल घराणें पुढें आलें. त्यांतला गोविंदचंद्र हा फार प्रख्यात राजा होता. त्यानें पुन्हां कनोजचें वैभव उभारून ५० वर्षे राज्य केलें (११००-६०). त्याचा नातु जयचंद होय. मुसुलमानांनीं त्याला हिंदुस्थानचा सम्राट म्हटलें आहे. त्याची व मुहम्मद घोरी याची मोठी लढाई ११९४ त होऊन जयचंदाचा मोड झाला. सांभर व अजमेर येथील प्रख्यात चाहमान कुळात प्रसिध्द पृथ्वीराज चव्हाण उर्फ रायपिठोरा जन्मला. त्याचा तुलता विग्रहराज (चवथा) हा फार विद्वान असून त्यानें रचलेलीं दोन नाटकें (कांही प्रवेश) अजमेर येथें शिलालेखरूपांत आज दृष्टीस पडतात. पृथ्वीराजानें जयचंद गढवालाची मुलगी संयोगिता हिचें ११७५ चे सुमारास हरण केलें व ११८२ त चंदेल्लांचा पराभव करून आपलें अजमीर व दिल्लीचें राज्य वाढविलें. त्यानें मुहम्मद घोरीस अनेक वेळां जोराचा अडथळा केला, पण ११९३ तील ठाणेश्वर जवळील तरैनच्या लढाईत तो कैद झाला. हा फार शूर असल्यानें उत्तर हिंदुस्थानांतील बहुतेक भाट लोकांचा वर्ण्यपुरुष होऊन बसला असून, हिंदुस्थानचा शेवटचा वीर म्हणून त्याच्याबद्दल सर्वत्र पूज्यबुध्दी आढळते. त्याचा भाट चंदबरदाई यानें ५००० कबित्तांचा पृथ्वीराज रासा नांवाचा ग्रंथ केला असून सांप्रत त्याची संख्या १। लाख झाली आहे. मूळ ग्रंथ विश्वसनीय आहे व त्यांत पृथ्वीराजाचें चरित्र दिलें आहे. पृथ्वीराजाच्या दिल्लीची (हल्ली कुतुबमिनारच्या आसपासची जुनी दिल्ली) स्थापना ९३० च्या सुमारास झाली असावी. तोमर राजांनीं ११ व्या शतकांत तेथें अनेक देवळें बांधलीं. तींच पाडून पुढें मुसुलमान राजांनीं आपल्या इमारती बांधल्या. पृथ्वीराजाची लाट म्हणून प्रसिध्द असलेल्या घडीव लोखंडी स्तंभाचें वर्णन मागें आलेंच आहे. ही लाट समुद्रगुप्ताची असून २४ फूट उंच व ६ टन वजनाची आहे. हा हिंदु कारागिरीच्या कामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

मुहम्मद घोरीनें ११७८ च्या सुमारास गुजराथेवर स्वारी केली परंतु तेथील मूलराज या राजानें त्याला इतक्या जोरानें पिटाळलें कीं, त्यापुढें एक शतकपर्यंत कोणाहि मुसुलमान राजानें गुजराथ जिंकण्याचा प्रयत्न केला नाहीं. तैरनच्या लढाईनंतर कनोजचा राजा जयचंदहि या सुमारास एका लढाईत पडला. त्यामुळें मुसुलमानांची सत्ता उत्तर हिंदुस्थानांत पहिल्यानें स्थापन झालीं. तत्कालीन हिंदु लोक धर्मशास्त्राप्रमाणें युध्दें करीत व मुसुलमानादि परकीय लोकयुद्धांत धर्म व गैरे पाळीत नसत. त्यामुळें दोन हिंदू राजांत जें धर्मयुध्द चालें, तें या परक्या लोकांच्या कामांत उपयोगी न पडतां उलट हिंदूंचा पराजय होई. शिवाय ह्या परक्या लोकांची सर्व भिस्त चपळ घोडदळ व तोफखाना यांवर असे तर हिंदूची गजदळावर असे; पण पहिल्यापुढें दुसर्‍याचा निभाव लागत नसे; त्यामुळें हिंदूंच्या पदरीं अपजय येई. परंतु यापासून घ्यावयाचा तो धडा अद्यापहि हिंदु लोक घेत नाहींत. हिंदु लोक हे या परक्या लोकांइतकेच प्राणाविषयीं बेफिकीर व शूर आहेत, पण वरील दोषामुळें त्याचा कांही उपयोग होत नाहीं. मुहम्मद घोरकर परत गेल्यावर त्याचे सेनापति कुत्बुद्दीन ऐबक व मुहम्मद खिलजी यांनीं दिल्ली घेऊन (११९३), बिहार प्रांत काबीज केला. नंतर त्यांनीं हजारों देवळे पाडलीं व अमानुष कत्तल केली. मुसुलमान इतिहासकार म्हणतात कीं, बिहार प्रांतांतील सर्व क्षौरी ब्राह्मण मुहम्मदानें ठार मारलें. हे ब्राह्मण बहुधां बौध्द भिक्षू असावेत. कारण त्यावेळीं बिहार प्रांतांत बौध्दधर्म थोडा फार टिकून होता. यापुढें मुसुलमानांच्या जुलुमानें बौध्द लोक तिबेट, चीन, नेपाळ, व दख्खनकडे पळून गेले आणि उत्तर हिंदुस्थानांत बौध्दधर्म नामशेष झाला (११९७). यावेळीं मुसुलमानांनीं मोठमोठी ग्रंथसंग्रहालयें जाळून टाकलीं व असंख्य बुध्दमूर्ती, मठ, स्तूप, स्तंभ इत्यादि सुंदर इमारती आणि देवळें मोडूनतोडून टाकून त्याजागीं मशिदी उभारल्या. मुहम्मद खिलजीनें ११९९ चे सुमारास बंगालचा शेवटचा ब्राह्मण राजा लक्ष्मणसेन याचा पराभव करून गौड येथें आपलीं राजधानी स्थापिली. या वेळेपासून बंगालचें स्वातंत्र्य नष्ट झालें. महोबाच्या चंदेल्ल राजाच्या प्रधानानें फितूर करून प्रख्यात कालिंजरचा किल्ला कुत्बुद्दीनच्या हवालीं केला (१२०३). पुढें मुहम्मद घोरकर मेल्यावर कुत्बुद्दीन यानें आपल्याला दिल्लीचा सुलतान म्हणून जाहीर केलें (१२०६). हा मूळचा गुलाम असल्यानें याच्या वंशास पुढें गुलाम घराणें म्हणूं लागले. हा अत्यंत क्रूर, माथेफिरू व हिंदूंची निष्कारण कत्तल करणारा होता. मुसुलमानांची सत्ता स्थापन होण्यास त्या लोकांनीं लढाऊ व बिनलढाऊ अशा असंख्य हिंदु लोकांची केलेली कत्तल हें कारण होय. या रानटी गोष्टीची मुसुलमानी इतिहासकारांनीं मोठी स्तुति केली आहे. कुतुब व त्यापुढील दिल्लीचे सुलतान यांनां स्मिथनें रक्तपिपासु म्हटलेले आहे (ऑ. हि. २२३). कुतुबच्या वेळेपासून मुसुलमानी शिल्प हिंदुस्थानांत सुरू झालें; त्यांतील प्रख्यात इमारत म्हणजे कुत्बुमीनार होय. जवळजवळ २७ हिंदु देवळें पाडून त्यांच्या सामानानें ही बांदली आहे. मुहम्मद खिलजी हा आसामवर चालून जात असता त्याचा खून झाला (१२०५), व कुतुब हा १२११ त मेला. त्याचा जावई इल-तुत- मिश (अल्तमश) यानें थोडासा राज्यविस्तार करून सासर्‍याप्रमाणें हिंदु देवळांच्या अवशेषांनीं अजमेर येथें एक सुंदर मशीद बांधली. याच्या कारकीर्दीतच चेंगीजखान या प्रसिध्द मोंगल लुटारूची धाड पेशावरपर्यंत येऊन परत गेली; याचे खरें नांव तेमूजन उर्फ तमूर्ची असून चेंगीज ही चिनी पदवी होती. तबकात ई-नासिरीच्या मुसुलमान कर्त्यानें चेंगीजला खाटीक म्हटलें आहे. इल-तुत मिशची मिलगी रझिय्यत इनें तीन वर्षे शांतपणें राज्यकारभार केला, पण पुढें तिच्या सरदारांनींच तिचा खून केला. तिच्यानंतर तिचा भाऊ नासिरुद्दीन ह्यानें २० वर्षे राज्य केलें. हा फार धर्मवेडा होता तबकात ई- नासिरीचा कर्ता मिनहाज-ई- सिराज हा याचा एक अधिकारी होता. नासीरचा सासरा वल्बन यानें जांवयाचा खून करून गादी बळकावली. हा मूळचा इलतु- तमिशचा एक गुलाम होता. हा अत्यंत क्रूर असून माणसें ठार मारण्याबद्दल व रक्ताचा सडा पाडण्याबद्दल त्याला कांहीच खंती वाटत नसे. गुप्त हेरांच्या बळावर त्यानें ६० वर्षे राज्य चालविलें. त्यानें हिंदूंनां अत्यंत छळलें. त्यानें स्वतःविरुध्द उठलेल्या मेवाती हिंदूंचा पराभव करून त्यांतील १२ हजार कैद्यांची कत्तल केली. यांत म्हातारे, लहान मुलें व बायकाहि होत्या. आणि १०० माणसांच्या अंगांची कातडी सोलून काढून त्यांत पेंढा भरून ती दिल्लीच्या निरनिराळ्या वेशींवर टांगून ठेविलीं. राज्यांतील ठिकठिकाणाच्या मोठमोठ्या शहरांच्या बाहेर सुळी देण्याच्या सुळांच्या रांगाच्या रांगा दिसत असत. (स्मिथ) याच्या पदरीं अमीर खुश्रु नांवाचा एक उत्तम फारशी कवि होता. बलबन नंतर गुलाम घराणें नाश पावले. या घराण्यांतील सुलतान हे क्रूर, धर्मवेडे व व्यभिचारी होते. त्यांनीं हिंदूंचा अत्यंत छळ करून केवळ सैन्याच्या बळावर पंजाब, संयुक्तप्रांत, बिहार, बंगाल व सिंध या प्रांतांवर आपली सत्ता स्थापिली. या घराण्यानंतर खिलजी घराणें गादीवर आलें. त्यांतील पहिला राजा जलालुद्दीन यानें मोंगल लुटारूंनां भीतीनें मोठमोठ्या सरकारी जागा दिल्या व त्यांनां मुसुलमान केलें. यापुढें यांनां नवीन मुसुलमान असें संबोधण्यांत येऊन त्यांचें हिंदुस्थानांत कायमचें वास्तव्य झालें. जलालच्या कारकीर्दीत ठगांचा पहिला उल्लेख आढळतो. जलालला ठार मारून गादीवर बसणारा त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन हा रानटी, मूर्ख, अन्यायी, क्रूर व जुलमी होता. बराणी हा इतिहासकार म्हणतो कीं, त्यानें निरपराधी बायका, मुलें यांनां सुद्धा ठार मारून रक्तपात करणार्‍यांत नांव मिळविलें. स्वतःच्या वाटेंत येणार्‍या प्रत्येकाची अत्यंत निष्टूरपणें कत्तल करून त्यानें राज्य हांकलें, त्यामुळें त्याच्या कारकीर्दीत अनेक बंडें उद्भवलीं व अनेक कट उभारले गेले. ते नामशेष करण्यांतच त्याचें आयुष्य खर्च होऊन, गुजराथशिवाय त्याचा राज्यविस्तार झाला नाहीं. दख्खनवर त्यानें कांही स्वार्‍या केल्या आणि उत्तरेकडे रणथंबोर व चितोड हे प्रख्यात किल्ले घेतले. मोंगल लोकांनीं १२९७- १३०५ पर्यंत अनेकदां हिंदुस्थानावर स्वार्‍या केल्या. एकदां (१३०३) तर त्यांनीं दोन महिने दिल्ली आपल्या ताब्यांत ठेवली होती. त्यांच्यापैकीं जे नुक्तेच मुसुलमान झाले होते त्यांनीं बंड केलें, तेव्हां अल्लाउद्दीनानें त्या सर्वाची (१५ ते ३० हजार) कत्तल केली. दख्खनमधून मलिक काफूरनें देवगिरीकर यादव, द्वारसमुद्रकर होयसळ व मदुरेकर पाण्ड्य यांचा पराभव करू अगणित संपत्ति दिल्लीस आणली. चित्तोड घेतांनाच प्रख्यात प्रद्मिनीची कथा घडलेली आहे (१३०३). अल्लाउद्दीनानें मूर्खपणाच्या बर्‍याच गोष्टी केल्या. यानें हिंदूंनां छळण्यांत पूर्वीच्या सुलतानांवर ताण केली. त्यानें सर्व हिंदूंनां भरडून काढण्यास व भिकारी करण्यास सरकारी हुकूम काढले होते. उत्पन्नाच्या निम्मा शेतसारा घेण्याची अत्यंत जुलमी रीत त्यानें उपयोगांत आणली. गुप्त हेरांच्या बळावर अतीशय जुलूम करून त्यानें राज्य चालविलें. (स्मिथ) त्यानें दिल्लीजवळ सिरी (हल्लीचें शहापूर) नांवाचें शहर वसवून कांही इमारतीहि बांधल्या; परंतु त्या पुढें शेरशहानें पाडून टाकल्या. कुत्बुमीनारजवळ दुसरा एक मीनार बांधण्यास त्यानें प्रारंभ करून त्यावेळीं हजारों मोंगलांच्या रक्ताचा सडा (शांतीसाठीं म्हणून) तेथें शिंपविला (स्मिथ). त्याचा मुलगा मुबारक हाहि मूर्ख, क्रूर, व्यभिचारी व कुचकामाचा होता. फक्त देवगिरीच्या हरपालदेवाचा पराभव करण्याचेंच काय तें काम त्यानें केलें. बायकी अलंकार व पोषाख घालून तो खुषमस्कर्‍यांत बसे. या नादान राजाचा वध त्याचा आवडता सरदार खुश्रु (हा मूळचा हिंदु होता) यानें करून, पुन्हां हिंदू राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला पण कांही महिन्यांनीं सर्व मुसुलमान एक होऊन त्यांनीं तो प्रयत्न ढांसळून टाकला; आणि आपल्यांतील एक गाझी मलिक यास गादीवर बसविलें. गाझीचा बाप बल्बनचा गुलाम असून आई जाट जातीची होती. गाझीनें स्वतःस घीयासुद्दीन तुघ्लक नांव घेऊन राज्यांत बरा बंदोबस्त केला. त्याचा मुलगा जूना खान यानें वरंगळवर स्वारी केली असतां तेथींल हिंदूराजानें त्याला पिटाळून लाविलें, म्हणून पुन्हां त्यानें जास्त सैन्यानिशीं जाऊन राजाचा पराभव केला, व बेदर घेतलें. नंतर तो दिल्लीस आला व त्यानें विश्वासघात करून आपल्या बापाच्या व भावाच्या अंगावर एक लांकडी घर कोसळवून त्यांचा खून केला आणि स्वतःस मुहम्मद नांव घेऊन गादी बळकावली (१३२५). अल्लाउद्दीन खिलजीप्रमाणेंच यानें २६ वर्षे अत्यंत जुलूम करून राज्य केलें. जगांत जे अत्यंत जुलमी व क्रूर राजे होऊन गेले त्यांतील हा एक होता. बापानें मिळविलेली सर्व संपत्ति त्यानें उधळून टाकली. त्याच्या दरबाराचा भपकाहि फार मोठा होता. आफ्रिकेचा रहिवासी व प्रवासी आणि मुहम्मदचा ५ वर्षे नौकर असलेला इब्न बतूता यानें व मुहम्मदचा सरकरी अधिकारी झियाउद्दीन बराणी ह्यानें या काळच इतिहास प्रत्यक्ष पाहून लिहिलेले आहेत. त्यावरून मुहम्मद हा विद्वान, शूर, दारू न पिणारा, उत्तम वर्तनाचा परंतु अत्यंत क्रूर, खुनी व जुलमी होता असें दिसतें. बतूता म्हणतो कीं, तो किंचित वेडसरहि असावा. त्याच्या दुष्कृत्यांचें वर्णन करण्यास लेखणीहि धजावत नाहीं असें स्मिथ म्हणतो. मनांत येईल ती लहर पुरविण्यास तो मागें पुढें पहात नसे. तो स्वतः म्हणते कीं, मी म्हणेन तसें लोक वागत नाहींत म्हणून साध्या अपराधासाठींहि मी त्यांनां ठार करतो व शेवटपर्यंत करीन. दिल्लीच्या लोकांनीं स्वतःच्या जुलुमाविरुध्द तक्रारी केल्यामुळें ५ कोस लांबीची दिल्ली राजधानी मोडून देवगिरी (दौलताबाद) राजधानी करणें (सर्व दिल्ली ओस पडली असतां एक आंधळा व एक अर्धांगवायू झालेला अशीं दोन माणसें मुहम्मदाच्या आढळण्यांत आलीं, पैकीं आंधळ्याला थेट देवगिरीपर्यंत फरफटत नेण्याची व दुसर्‍याला तोफेच्या तोंडी देण्याची त्यानें शिक्षा दिली. आंधळ्याच्या शरीराचे तुकडे होऊन फक्त एक तंगडी तेवढी देवगिरीस गेली), तर्मशिरीन मोंगलानें थेट दिल्लीवर चाल केली असतां त्याला भरभक्कम लांच देणें, इराणवर स्वारी करणें, चांदीच्या नाण्यांची किंमत तांब्यांच्या नाण्यांनां लावणें, चीनवर स्वारी करण्यासाठीं १ लाख घोडदळ पाठवून त्याचा नाश होऊन त्यांतील बचावून आलेल्या १० स्वारांनांहि स्वतः ठार मारणें, बंडखोर भाचाच्या अंगाचें जीवंतपणीं कातडें सोलून त्याच्या मांसाचा भात त्याच्या बायकामुलांस खाण्यासाठीं पाठविणें, कनोजपासून रायबरेलीपर्यंतची सर्व हिंदु माणसें कापून काढणें, इ. इ. अनेक क्रूर व माणुसकीस काळीमा आणणारीं कृत्यें मुहम्मदानें केली. त्यामुळें त्याच्या राज्यांत सर्वत्र बंडाळी माजली व त्याच्या राज्यांतील बंगाल, दख्खन, तेलंगण, इ. बरेच प्रांत स्वतंत्र बनले, भयंकर दुष्काळ पडून प्रजा भिकारी झाली आणि बहामनी व विजयानगर हीं प्रतिस्पर्धी राज्यें उत्पन्न झालीं. शेवटीं बंडें मोडित असता मुहम्मद हा सिंध प्रांतांत १३५१ त मेला. त्याच्या नंतर गादीवर आलेल्या फिरोझशहानें बंगालवर स्वारी करून १ लाख ८० हजा लोकांची कत्तल केली, तरी बंगाल त्याच्या हातीं आला नाहीं व सिंधहि स्वतंत्र बनला. फिरोज हा श्रध्दळु, इमारतींचा शोकी व साधारण थंड प्रवृत्तीचा होता. फिरोजाभाद (दिल्लीजवळील इंद्रपत), हिस्सार, फिरोज, जोनपूर इ. गांवं त्यानें वसविलीं. त्यानें आपल्या ३७ वर्षाच्या कारकीर्दीत बांधलेल्या मशिदी, किल्ले, गांवें, कॉलेजें, बंधारे, कालवे इ. शिल्पकामांची एक स्वहस्ताची यादी लिहून ठेवली आहे. सरकारी अधिकार्‍यांनीं पूर्वी जहागिरी देत असत, ती पध्दत अल्लाउद्दीन यानें मोडून रोख पगार सुरू केला होता, पण फिरोझनें पुन्हां जहागिरी दिल्या; ही पध्दत पुढें अकबरानें बंद केली आणि पगाराची पध्दत सुरू केली. लढाईत पकडलेल्या लोकांनां बाटवून गुलाम करण्याची चटक फिरोजला इतकी होती की, त्याच्या परिवारांत १ लक्ष ८० हजार गुलाम होते अर्थात त्यांनां गुलाम बनविण्यांत थोडाफार जुलूम होईच; खेरीज हिंदूंनां त्रास देणें, त्यांचीं देवळें पाडणें, त्यांच्या धर्मगुरूंनां ठार मारणें, त्यांच्यावर जीझया (दरेकास दरसाल १०॥ रुपये) बसविणें, त्याच्या सुटीची लालूच दाखवून हिंदूंनां बाटविणें, इत्यादि जुलमाच्या गोष्टी त्यानें केल्याच, मात्र पूर्वीच्या अमानुष व रानटी शिक्षा त्यानें बहृंशी बंद केल्या. सांप्रत दिल्लीस असलेले दोन अशोकचे लेखांकित शिलास्तंभ हे फिरोजनेंच तोग्रा व मीरत येथून आणले. त्याच्या मरणानंतर (१३८८) व तैमूरची स्वारी होईपर्यंत दोन तीन नांवाचे सुलतान गादीवर बसले होते, पण राज्यांत सर्वत्र बंडाळी माजली होती (स्मिथ).

अमीर तैमूर हा जातीचा बर्लास तुर्क असून त्याचा जन्म १३३६ त होऊन तो समरकंदच्या गादीवर १३६९ त बसला. चेंगीजखानाप्रमाणेंच यानेंहि ठिकठिकाणीं स्वार्‍या करून जुलूम व रानटीपणाचा कळस केला. हिंदुस्थानांतील अराजकतेचा फायदा घेऊन त्यानें ९० हजार घोडदळासह मुलतान मार्गानें चालून येऊन व पानपित येथें महमूद तुघ्लखाचा पराभव करून दिल्लीस आपल्याला बादशहा म्हणून जाहीर केले परंतु दिल्लीच्या लोकांनीं बंड केल्यानें त्याने १ लाख लोकांची कत्तल केली व पांच दिवस लूट करून पिढ्यानपिढ्या सांठलेली दिल्लीची सर्व संपत्ति बरोबर घेऊन व वाटेंतील गांवें लुटून व जाळूनपोळून तो आपल्या देशीं परत गेला (१३९८). (स्मिथ) या स्वारीनें पुढें २०० वर्षें उत्तरेकडे नाण्यांचा व चांदीसोन्याचा तुटवडा पडला होता. यापुढें ५० वर्षें दिल्ली येथें नांवाचा मुसुलमान राजा राही व त्याचा अंमल दिल्लीच्या आसपासच्या अत्यंत थोड्या प्रदेशावर चाले, बाकी सर्व देश निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांत समाविष्ट झाले होते. हे नांवाचे दिल्लीचे राजे स्वतःस सय्यदवंशांतील म्हणवीत; त्यांतील शेवटचा अल्लाउद्दीन याचा पराभव करून पंजाबचा अफगाण सुभेदार बहलोल लोदी हा दिल्लीचा राजा बनला (१४५०). बहलोलनें थोडासा राज्यविस्तार करून बंडाळी मोडली. त्याच्या शिकंदर नांवाच्या मुलानें बिहार प्रांत काबीज केला. त्या काळीं प्रांत काबीज करणें याचा अर्थ स्वतंत्र सुभेदारांपासून वार्षिक कांही तरी खंडणी घेणें असा होई. शिकंदर कट्टा मुसुलमान असून त्यानें हिंदूधर्माचा फार द्वेष केला. मथुरेचीं सुप्रसिध्द देवळें त्यानें जमीनदोस्त केलीं. मात्र त्याच्या राज्यांत सुबत्ता होती. महमूद गिझनीकरानें आग्रा शहर नामशेष केलें होतें, ते यानें पुन्हां बसविलें आणि अकबराचें थडगे असलेलें शिकंदरा गांवहि यानेंच बसविलें. याच्या कारकीर्दीत उत्तर हिंदुस्थानांत (व इराणांत) मोठा भूकंप होऊन बरेंच नुकसान झालें (१५०५). शिकंदरानंतर त्याचा मुलगा इब्राहिम हा गादीवर आला. तो दुर्बळ असून त्याची व त्याच्या अफगाण सरदारांची नेहमीं भांडणें होत अखेर सरदारांनीं काबूलच्या बाबर बादशहास बोलावणें धाडलें त्याप्रमाणें किरकोळ लढाया करून अखेरीस १५२६ त काबूल सोडून बाबर पानिपत येथें येऊन पोहोंचला व त्यानें तेथें इब्राहीमला लढाईत ठार करून दिल्लीचें तक्त आपल्या ताब्यांत घेतलें (२१ एप्रिल).

फिरोझ तुघ्लकानें जोनपूर नांवाचें शहर स्थापलें होतें; तेथें महमूद तुघ्लकानें एक खोजा ख्वाजा जहान ही पदवी देऊन पूर्वेकडील प्रांताचा सुभेदार (मलिक- उसः शर्क) म्हणून ठेवला (१३९४). तैमूरच्या बंडाळींत याचा मुलगा स्वतंत्र बनून त्यानें मुबारकशहा शर्की (पौर्वात्य) हें नांव धारण केलें (१३९९). त्याच्या मागें त्याचा भाऊ इब्राहिम यानें ४० वर्षे राज्य करून मुसुलमानी धर्माचा प्रसार केला. त्याचा मुलगा महमूद व त्याचा हुसेन, हुसेनवर बहलोल लोदीनें चाल करून त्याला बंगालकडे पळवून लावलें (१४७६); व हें ७५ वर्षे टिकलेलें स्वतंत्र राज्य नष्ट केलें आणि तेथें आपला मुलगा बारबक यास सुभेदार नेमलें. त्याला शिकंदर लोदीनें हांकलून हें राज्यच खालसा केलें. येथले राजे फारशी व आरबी वाङ्मयांस उत्तेजन देणारे व इमारतीचे शोकी होते.

दिल्लीच्या वरील सव्वा तीनशें वर्षाच्या (१२०६- १५२६) सुलतानशाहींत बहुतेक रक्तपाताचाच इतिहास भरलेला आहे. बहुतेक सुलतान रक्तपिपासू, जुलमी, क्रूर, विश्वासघातकी असून सर्व सुलतान (फिरोज तुघ्लक सुद्धा) कट्टे धर्मवेडे व हिंदुधर्माचे द्वेष्टे होते. थोड्या जणांनीं फक्त मुसुलमानी (आरबी, फारशी) वाङ्मयास आश्रय दिला होता. त्यांनीं मक्कामदिना व दमास्कस इकडील मुसुलमानी शिल्प इकडे प्रचारांत आण्लें पण त्याच्यावर हिंदूशिल्पाची दाट छाया पडलेली आहे. असंख्य हिंदू देवळें व शिल्पकामें पाडून त्यांनी आपल्या मशिदी, राजवाडे वगैरे कामें उभारलीं.

मुसुलमानांनीं हिंदूंनां कोणत्या साधनांनां जिंकलें त्याच्या थोडक्यांत नामनिर्देश पुढीलप्रमाणें. मुसुलमान हे थंड आणि डोंगराळ देशांतील असल्यानें शरीरांनें हिंदूपेक्षां जास्त मजबूत, काटक आणि आडदांड; त्यांच्यांत जाती नसल्यानें व मांसाहार असल्यानें त्यांचें कोठें नडत नाहीं व लढण्याच्या कामीं जास्त चिकाटी येते; त्यांचे विलक्षण धर्मवेड; मुसुलमानेतर सर्व लोकांस लुटणें, ठार मारणें, त्यांची देवळणें मोडणें इ. गोष्टी करण्यास त्यांची धर्माज्ञा; त्यासाठीं निर्दय बनून लाखो लोकांची कत्तल करून व नाना तर्‍हेचे रानटी अत्याचार करून अल्लास खूष करतां येते ही भावना; या कामीं रणांत पडल्यास इहलोकीं गाझी (धर्मवीर) ही पदवी मिळून परलोकीं सर्व स्वर्गीय सुखें मिळतात हा विश्वास व त्यामुळें बिनधोक लढाई चालू ठेवणें; पराभव झाल्यास परत स्वदेशीं जाण्याची असाध्यता; हिंदुस्थानांतील अगणित संपत्ति मिळविण्याचा लोभ; लुटींत मिळणारा वांटा इ.इ. याच्या उलट हिंदूंची परिस्थिति असे. त्यांचें युध्दशास्त्र अत्यंत जुनें व धर्माच्या पायावर आणि हिंदूंहिंदूंत लढण्याच्या नियमावर बसविलेलें; जातीमुळें व तटामुळें सैन्यांतील शिस्तीचा अभाव; चपळ घोडदाळाचा व गमिनीकाव्याचा अभाव आणि त्याऐवजी अवजड व गोंधळ झाल्यास आपल्यास सैन्याचा नाश करणार्‍या गजदळाची बेसुमार संख्या; जातींजातींतील तंटे आणि एकीचा पूर्ण अभाव बंदुका व तोफा या शस्त्रांची माहिती पूर्णपणें नसणें, त्यांसाठीं परक्यांवर अवलंबून राहणें इ.इ. गोष्टीमुळें वास्तवीक शूर असलेले हिंदू लोक मुसुलमानां पुढें हरले.

या सुलतानांच्या कारकीर्दीत राज्यव्यवस्थेचे कायदेकानु फारसे प्रचारांत नव्हते. अल्लाउद्दीनानें बरेचसे नियम केले होते पण ते चुकीचे होते. बंगाल प्रांतांत मात्र हिंदु राजाची पूर्वापार चालत आलेली राज्यव्यवस्था चालू होती. वास्तविक १२ व्या शतकापासून मुसुलमानी अंमलाखालीं बंगाल गेला होता व तेथील सुभेदार पूर्णपणें स्वतंत्र असून नांवाला दिल्लीच्या राजाला खंडणी देत. असें असतांहि त्यांनीं बंगालमधील हिंदू राजांनां कायम ठेवून त्यांच्या राज्यव्यवस्थेस धक्का लाविला नव्हता. बंगाल इंग्रजांच्या ताब्यांत जाईपर्यंत परतंत्रच होता. सुलतानी सत्ता अत्यंत जुलुमी असे, तिला आळा बंडानें किंवा खुनानें पडे. अल्लाउद्दीन खिलजी व महंमद तघ्लख हे तर जुलम्यांचे म्होरके होते. लष्कराच्या हातीं सुलतान निवडण्याचें असे व त्यामुळें एकाच घराण्यांतील राजे न येतां वाटेल त्या (मुसुलमान) कुटुंबांतील येत. मुसुलमानी देशांतून इकडे येऊन वसति करणें व जुलुमानें किंवा लालूच देऊन बाटविणें. या साधनांनीं मुसुलमानांनीं आपली संख्या वाढविली; संख्या वाढविण्यांत त्यांची गति हिंदूंपेक्षां जास्त आहे. शक, हूण इत्यादि प्राचीन बाह्यांप्रमाणें मुसुलमान हे हिंदूंच्या चातुर्वर्ण्यात मिसळून गेले नाहींत याचें कारण शकादींनां स्वतःचा धर्म नव्हता म्हणून त्यांचा ब्राह्मणी धर्मापुढें टिकाव लागला नाहीं. मुसुलमानांनां स्वतःचा धर्म होता, व तो ताजाच निघाला असल्यानें त्याच्याविषयीं त्यांच्या ठिकाणीं उदासीनताहि आली नव्हती, उलट त्याच्या ठायीं अत्यंत निष्ठा (किंबहुना अंधभक्ति) होती. पहिल्यानें हे मुसुलमान लोक सामान्य हिंदु समाजांत मिसळत नसत. पण बर्‍याच काळानें ही स्थिति पालटली बाटल्या हिंदूंत अद्यापीहि अर्धवट हिंदू चालीरिती व धर्माचार शिल्लक राहिले आहेत. या दोन जातींच्या बर्‍याच दिवसांच्या संघट्टणामुळे एक स्वतंत्र उर्दू नांवाची (दिल्लीकडील हिंदी व फारशी मिश्रित) भाषा अस्तित्वांत आली. ऊर्द हा तुर्की शब्द असून त्याचा अर्थ लष्कर असा आहे. लष्करांतील भाषा असल्यानें तिचा प्रसार जलद झाला. हिचें व्याकरण व रचना हिंदी असून शब्दांचा भरणा मात्र फारशी आहे. सांप्रतच्या हिंदुस्थानांतील मुसुलमानांची मायभाषा ऊर्दूच असून तींत पुष्कळ मुसुलमानांनीं ग्रंथ लिहिले आहेत. अमीर खुश्रु (१३२५) याच्या ग्रंथांत पुष्कळ हिंदी शब्द आढळतात. मुसुलमानी एकेश्वरी धर्माचा थोडासा परिणाम हिंदु धर्मावरहि झाला. एकेश्वरत्व हें हिंदूधर्मात मूळचें आहे, पण मुसुलमानांच्या आगमनामुळें त्याला थोडें जास्त उत्तेजन मिळून रामानंदी पंथासारखे कांही पंथ निघाले व हिंदु मुसुलमान या दोन भिन्न धर्माचा तीव्र झगडा जरासा शांत होत चालला. रामानंद (१३५०-८०)- मूळचा दख्खनमधील असून, त्यानें हिंदी भाषेंत आपला उपदेश चालू ठेवला व जातिभेदाकडे विशेष लक्ष दिलें नाहीं. त्याचे १२ मुख्य शिष्य असून त्यांत रजपूत, न्हावी, चांभार व मुसुलमान असे भिन्न भिन्न जातीचेहि होते. कबीर हा रामानंदाचाच शिष्य होता; त्यानें मूर्तिपूजा व जाती यांच्या विरुध्द मत प्रतिपादिलें आहे. त्याच्या शिष्यांत हिंदु व मुसुलमान दोघेहि असत. कबीराप्रमाणेंच इराणी साधु जलालुद्दीन रूमी हफीज याचें तत्त्वज्ञान होतें. असाच (हिंदूमुसुलमानांच्या धार्मिक एकीचा) प्रयत्न पुढें नानकनें केला व शीखपंथ काढला, पण मोंगल राजांच्या जुलमामुळें शीख हे मुसुलमानांचे कट्टे द्वेष्टे झाले. हिंदुस्थानांत या धार्मिक बाबतींत एक विशेष मौज अशी आढळते कीं, सनातनी धर्माच्या (चातुर्वर्ण्याच्या) विरुध्द म्हणून एखादा नवीन धर्मपंथ कोणीं काढल्यास कांही काळानें तो पंथच मूळच्या हिंदु जातींत आणीक एका जातीची भर घालतो पण चातुर्वर्ण्य नष्ट होत नाहीं. कौटिल्याच्या अर्थशास्त्रांत स्त्रियांच्या पडदपोशीचा क्वचित उल्लेख आढळला तरी मुसुलमानांच्या आगमनापासून (व त्यांच्या जुलुमापासून रक्षण करण्यासाठीं) ही चाल विशेष प्रचारांत आली. [झिय्याउद्दीन बराणी- तारीख ई फिरोझशाही; इब्नबतूता- ट्रॅव्हल्स; इलियट ऍंड डॉसन मा. ३. ४, ५; फिरिष्ता; बदौनी; थॉमस- क्रॉनिकल्स ऑफ पठाण किंग्ज ऑफ दिल्ली; अहमदशहा- कबीर; फर्कुहर- प्रीमीअर ऑफ हिंदुइझम; राव्हर्टी- तबकात- ई- नासीरी; तबकात- ई- अकबरी; राव्हर्टी- नोट्स ऑन अफगाणिस्थान; चंद- पृथ्वीराजारासा; अल्बेरूणी; स्मिथ; वैद्य]

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

समर्थ संप्रदाय

महान सम्राट कृष्णदेव राय