पद्मिनी- ही सिंद्दलद्वीपच्या हमीरसिंग राजाची मुलगी

विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें   

पद्मिनी- ही सिंद्दलद्वीपच्या हमीरसिंग राजाची मुलगी, चितोडचा राणा लक्ष्मणसिंग याचा चुलता भीमसिंग याची ही बायको; ही अतिशय सुंदर होती म्हणून अल्लाउद्दीन खिलजीनें हिच्या लोभानें चितोडवर स्वार्‍या केल्या होत्या. पहिल्या स्वारींत पुष्कळ दिवस वेढा देऊनहि त्याच्या हातीं चितोड पडेना तेव्हां एकवार पद्मिनीस पाहून मी परत जातो असा त्यानें निरोप पाठविला. आरशांत तिचें दर्शन तुम्हांस मिळेल असें भीमसिंगानें उत्तर दिलें. त्याप्रमाणें अल्लाउद्दीन थोड्या लोकांसह गडांत जाऊन त्यानें पद्मिनीचें दर्शन घेतलें व परत निघतांना विश्वासानें पोंचवावयास आलेल्या भीमसिंगास किल्ल्याबाहेर पडल्यावर त्यानें कैद केलें आणि पद्मिनी मिळाल्याशिवाय सोडणार नाहीं असें त्यास सांगितलें. हें पद्मिनीस समजतांच तिनें चमत्कारिक युक्ति केली. मी माझ्या इतमामाप्रमाणें भेटीस येतें असें सांगून तिनें बुरख्याच्या ७०० पालख्या तयार केल्या. प्रत्येकींत एक एक निवडक व शूर हत्यारबंद शिपायी होता. दरेक पालखीचे सहा भोईहि हत्यारें छपविलेले शिपायीच होते. नेमलेल्यावेळीं पालख्या अल्लाउद्दिनाच्यां छावणींत दाखल झाल्या व बादशहानें पद्मिनीस नवर्‍यास भेटण्यास अर्ध्या तासाची मुदत दिली. त्याच्या मनांत भीमसिंहास ठरल्याप्रमाणें सोडावयाचें नव्हतें. परंतु कांहीं रिकाम्या पालख्या किल्ल्यांत परत गेल्या त्यांपैकीं एकींत बसून तो पळून गेला. पद्मिनी वास्तविक आलीच नव्हती वेळ भरल्यावर बादशहानें विचारपूस केली तेव्हां रजपूत शिपायी बाहेर पडून त्यांनीं बादशहाच्या सैन्यावर हल्ला केला. परंतु अखेर खिलजीनें त्यांचा मोड केला. फजिती झाल्याचें पाहून व दिल्लीस बंडाळी झाल्याचें ऐकून बादशहा वेढा उठवून निघून गेला (१३०३). यावेळीं ज्या सातशें रजपुतांनीं भीमसिंगास सुखरूप किल्ल्यांत जाण्यासाठीं बादशहास अडवून धरिलें होतें त्यांचे मुख्य सरदार दोन होते. ते पद्मिनीच्या माहेरचे असून त्यांचीं नांवें गोर्‍हा व बादल हीं होतीं. त्यांनीं अत्यंत पराक्रम करून किल्ल्याच्या दारापाशीं आपले प्राण अर्पण केले परंतु भीमसिंहास सुखरूप आंत जाऊं दिलें. यांच्यावर रजपूत भाटांनीं कबित्तें केलीं आहेत. बादल सारा १२ वर्षांचा होता. पुन्हां पुढल्याच वर्षीं (१३०४) अल्लाउद्दिनानें चितोडास वेढा दिला. या वेळींहि रजपूतांनीं लढण्याची कमाल केली. शेवटीं आपला इलाज चालत नाहीं असें पाहून त्यांनीं बायकांचा जोहार करून स्वत: सर्वांनीं रणांगणांत प्राण अर्पण केले. अलाउद्दिनानें चितोड घेतलें परंतु जिच्यासाठीं त्यानें एवढी खटपट केली ती पद्मिनीं जोहारांत जळून खाक झाली होती. राजपुतान्यांत पद्मिनीला व तिच्याबरोबरच गोर्‍हा व बादल यांसहि फार पूज्य मानितात. तिच्यावर भाट लोकांनीं अनेक काव्यें केलीं आहेत. गडावर तिचा महाल अजूनहि पडक्या अवस्थेंत आहे. किस्सेपद्मावति नांवाचें एक फारशी काव्य हुसेन गझनीकर यानें लिहिलें आहे. भाख भाषेंत मलिक महंमद यानेंहि एक काव्य केलें आहे. स. १६५२ मध्यें राय गोविंद मुनशी यानें तुकफत-उल-कुलुब या फारशी गद्यग्रंथांत तिचें चरित्र दिलें आहे. [टॉड-राजस्तान. मेवाड; खोमानरासा; बील; फेरिस्ता].

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

Varāhamihira

महान सम्राट कृष्णदेव राय