रोहिले

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रोहिले - हे लोक इ.स. १७४० च्या सुमारास प्रथम उदयास आले. या लोकांची मूळ पीठिका अशी आहे की, यांचा मूळपुरूष जो अली महंमद रोहिला तो एका हिंदुस्थानी अहिराचा मुलगा असून, त्याच्या लहानपणापासून त्याचें पालनपोषण एका अफगाण गृहस्थाकडून झालें. या गृहस्थानेंच त्याचें अली महंमद रोहिला असें नांव ठेविलें होतें, व याच्या नांवावरून पुढें याच्या अनुयायांसहि रोहिले असें म्हणूं लागले. प्रथमारंभी हा मुरादाबादच्या नायब सुभेदारांच्या हाताखालीं अफगाण घोडेस्वरांच्या एका लहान तुकडीवरील अधिकारी होता. यानंतर अलीनें अधिक सारा द्यावयाचें मिष करून कांही जमीन आपल्या ताब्यांत घेतली. याच्या अतिक्रमाणाचा प्रतिकार करण्याकरतां पुढें प्रयत्‍न करण्यांत आला तेव्हां यानें बंड करून, वजीर कमुरूद्दिनखान याच्या नायबाचा पराभव केला. या सर्व गोष्टी जेथें घडून आल्या तो भाग अंतर्वेदीमध्ये असलेल्या कमुरूद्दिनखानाच्या जहागिरींतच असून, दिल्लीपासून त्याचें अंतर शंभर मैलांहून फारसें अधिक नव्हतें. रोहिले लोक दिवसेंदिवस अधिकाधिक प्रबळ होऊं लागले. हें पाहून त्यांचे निर्मूलन कसें करावें, याविषयीं अयोध्येचा नवाब वजीर सफदरजंग हा मनांत विचार करूं लागला. स. १७४८ च्या सुमासास अली महंमद हा मेला. अब्दालीनें हिंदुस्तानांत पहिली स्वारी केली तेव्हां (१७४८) रोहिले लोकांत अंत:कलह माजला होता. तरी पण त्यांनी आपली सत्ता हळू हळू अयोध्याप्रांतापर्यंत बसविल्यामुळें सफदरजंगास त्यांची भीति वाटूं लागली. म्हणून त्यानें अली महंमदाच्या मुलांच्या भांडणास उत्तोजनच दिलें. पुंढें अलीचा तिसरा मुलगा सादुल्लाखान, यानें आपला पालक हाफीज रहमत याच्या मदतीनें आपली सत्ता प्रस्थापित केली. सादुल्लाखानाच्या दोघा वडील भावांस अब्दल्लीनें कैद करून नेलें असल्यामुळें, त्यानां इतके दिवसपर्यंत भांडणांत पडतां आलें नव्हतें. परंतु पुढें ते कैदेंतून सुटून आल्यावर आपला हक्क सांगूं लागले. अब्दल्लीची भीति नाहींशी झाल्याबरोबर सफदरजंगानें रोहिलखंड काबीज करून तेथें नवलराय नांवाचा आपला सुभेदार नेमला. परंतु सफदरअली जातो न जातो तोंच, त्यांनी बंड करून नवलरायास ठार केलें. तेव्हां सफदरजंग चालून आला; परंतु त्याच्याहि पराभव झाला तेव्हां त्यानें मराठे व जाट यांच्या मदतीनें सर्व रोहिलखंड पादाक्रांत करून बर्‍याच रोहिले लोकांस कुमाऊन पर्वतांत हांकून लाविलें (१७५१). या मदतीसाठी म्हणून सफदरजंगानें रोहिलखंडातील बर्‍याचशा भागाचा वसूल मराठयांकडे लावून दिला.

इ. स. १७५५ त अबदल्लीनें स्वारी केली तेव्हां, त्यानें नजीबउद्दौला रोहिला यास मोगल बादशहाचा सेनापति नेमलें (नजीब उद्दौला पहा.). नजीब हा मराठयांचा कट्टा शत्रु होता; त्यानेंच पानपतचें युद्ध उपस्थित केलें. पुढें थोरल्या माधवरावानीं त्याचे उट्टे काढून रोहिल्यांचा फडशा उडविला (१७७२). महादजी शिंदे मोंगल बादशहाचा सेनापति नजीबखान यास बरोबर घेऊन रोहिलखंडांत आला. त्यानें गंगानदी अचानक ओलांडून रोहिल्यांच्या सैन्यावर हल्ला करून त्यांतील कित्येक लोक कापून काढले. यामुळें रोहिल्यांनां इतकी दहशत बसली कीं, मराठयांचें सैन्य आलें कीं ते तटबंदीचीं ठिकाणें व किल्ले भराभर सोडून पळ काढूं लागले. सरतेशंवटी मराठयांपासून आपलें रक्षण करण्याकरितां रोहिल्यांनी सुजाउद्दौल्याची मदत मागितली व तिच्याकरितां त्यास पैसाहि पुरविला. सुजा हा रोहिलखंड घशांत घालण्याकरितां पूर्वीपासून टपलेलाच होता. त्यानें रोहिल्यांच्या पैशावर आपलें सैन्य वाढवून त्यांनां बलहीन केले.

झाबितखानामागें त्याची सर्व जहागीर त्याचा पुत्र गुलाम कादर याचकडे आली. याच्या कारकीर्दीचीं अखेरची दोन वर्षे महादजी शिंद्याविरूद्ध लढण्यांत गेली. सन १७८८ मध्यें यानें दिल्लीस जे अत्याचार केले त्यांबद्दल प्रायश्चित देण्याकरितां मराठयांनी याला पकडून त्याचे हस्तपाददि सर्व अवयवं कापून त्याचा प्राण घेतला (१७८८) (गुलाम कादर पहा). सांप्रत रामपूर येथील नवाब हा रोहिल्यांच्या निराळ्या जहागिरदारांपैकी एकटाच कायम राहिला आहे. रोहिले लोक हे आडदांड असल्यानें फार करून लष्करांत नोकरी करितात, शिवाय किरकोळ (हिंग, काचेचे मणी ववैरे) व्यापारहि करतात. अलीकडें ते सावकारी करावयास लागले आहेत. कुळांपासून ते अतिशय भारी व्याज घेतात. (डफ; इंपे. ग्याझे; टाईम्स - इयरबुक, १९२५)-

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

Varāhamihira

महान सम्राट कृष्णदेव राय