फेरिष्ता (१५७०-१६११)- मुहंमुद कासीम फेरिष्ता हा इराणी इतिहासकार

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें  
            
फेरिष्ता (१५७०-१६११)- मुहंमुद कासीम फेरिष्ता हा इराणी इतिहासकार कास्पियन समुद्रकाठीं आस्त्राबाद येथें जन्मला. हा लहान असतांनांच त्याचा बाप गुलामअल्ली हा याच्यासह हिंदुस्थानांत आला. व तेथें दक्षिणेंत अहमदनगरच्या निजामशाहींत, पहिला मुर्तझा निजामशहाच्या वेळीं त्याला शहाजादा मिरान हुसैन याच्या पंतोजीची जागा मिळाली. त्याच्या वशिल्यानें मुहंमद हाहि दरबारीं मोठ्या योग्यतेच चढला. थोड्याच दिवसांत मुहंमदचा बाप मेला. मुर्तझाच्या मृत्यूनंतर (१५८९) तो विजापूरला गेला व इब्राहिम आदिलशहा (दुसरा) याच्या पदरीं राहिला. आदिलशाहाच्या आज्ञेवरून तरुणपणींच त्यानें हिंदुस्थानचा मुसुलमानी बादशहांचा विशेषतः दक्षिणेंतील राजांचा इतिहास लिहिला. निजामशाहीचा इतिहास त्यानें मलिकंबरापर्यंत आणून सोडला आहे (१६११). आदिलशाहीचा इतिहास स. १५९६ पर्यंत लिहिला आहे. तो स. १६११ च्या सुमारास मेला. त्याचा मृत्युशक नक्की नाहीं. याचा इतिहास साधारण बरा आहे. तरीपण त्यावर सर्वस्वी अवलंबून राहण्यासारखें नाहीं. त्याच्या इतिहासाचें नांव तारीख-ई-फेरिष्ता असें आहे. तो स्वतःला त्याला गुलशन इब्राहिमी व नौरसनामा असें म्हणतो. त्याच्या अकबरापर्यंत आलेल्या इतिहासाच्या पहिल्या व दुस-या भागाचें इंग्रजी भाषांतर कर्नल डौ यानें १७६८ सालीं केलें व दख्खनच्या इतिहासाचें जोनाथन स्कॉटनें केलें. पुढें सर्वच भागांचें भाषांतर १८२९ सालीं कर्नल ब्रिग्ज यानें केलें. (बील; इलियट, ६.२०७).

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

Varāhamihira

महान सम्राट कृष्णदेव राय