हिंमतबहादुर गोसावी.- किंवा अनुपगीर गोसावी

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद       
         
हिंमतबहादुर गोसावी.- किंवा अनुपगीर गोसावी. हा अंतर्वेदींतील अनुप शहराचा राहणारा होता. यानें गोसाव्यांचें एक छोटेसें सैन्य तयार केलें होतें. हा या गोसाव्यांचा गुरु व सरदारहि होता. यानें प्रथम अयोध्येचा नबाब सुजा याची चाकरी पत्करली आणि त्याच्या मृत्यूनंतर मग तो स्वतंत्र राहून मराठे, मोंगल, रजपूत, रोहिलें इंग्रज वगैरेनां ज्यांनां मिळालें असतां आपला फायदा होईल त्यांना मदत करी. याचा वडिल भाऊ उमरावगील हाहि चांगला शूर असून अयोध्येच्या नबाबाच्या बाजूस असे. नानासाहेब पेशव्यांच्या सांगण्यावरून दत्ताजी शिंदे हा बंगाल्यावर चढाई करण्याच्या उद्देशानें, प्रथम नजीबखानाच्या अंतर्वेदीत शिरला व त्यानें त्याचा इतका धुव्वा उडविला कीं, अखेरीस नजीब्यानें सुजाची मदत मागितली. सुजानें हें मराठयांचे अरिष्ट आपणांवरहि कोसळेल हें पाहून, अनुपगीर यास दहा-बारा हजार फौजेसह, नजीब्याशीं गुप्त तह करून त्याच्या मदतीस धाडिले. अंताजी माणकेश्वर व बुंदेले यांच्याशी, अनुपगीरचा सामना झाला (१७५७ मे) इतक्यांत अबदाली चालून येत असल्याची बातमी आली, तेव्हां दत्ताजीनें अनुपगीरच्या मध्यस्थीनें सुजाशीं कारस्थान चालविलें; परंतु सुजानें थापाथापी लाविली. तिकडे नजीब्यानें अबदालीस बोलावणें धाडिलें; आणि शेवटीं अनुपगीर व सुजा याच्या थापाथापीस भुलून दत्ताजी चकला. मार्गे अबदाली व पुढें रोहिले याच्या कैचीत तो सांपडून बदाऊ घांटाच्या लढाईंत त्याचा नाश झाला (नोव्हेंबर-डिसेंबर) बक्सारच्या लढाईंत सुजातर्फे हा हजर होता (१७६३). यानें याला अंतर्वेदी प्रांत सन १७७५ त इजाऱ्यानें दिला सुजा मेल्यानंतर नशीबखानानें याला सरदारी दिली व जयपूरच्या राजकारणावर खंडणी वसुलीत पाठविलें. पाटीलबाबानें गुलाम कादराचा पराभव करून दिल्लीस आपलें वर्चस्व स्थापिलें त्यावेळीं अनुपगीर दिल्लीस कारस्थानांत गुंतलेला होता. दुर्बल शहाअलमनें त्याला राजा ''हिंमतबहाद्दर'' ही पदवी दिली होती. पाटीलबाबानें याच्या मार्फत नशीब व दिल्ली दरबार यांनां इंग्रजांविरुद्ध वळविण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो फुकट गेला. पुढें नजीब व अनुपगीर यांचा बेबनाव होऊन तो अंतर्वेदीतून निघून जयपुरास आश्रयास राहिला. अफरासियाबखान व मराठे यांच्यांत अनुपगीरच्याच मध्यस्थीनें पत्रव्यवहार होई. अनुपगीर हा अनेक भानगडी करी. तो होळकर व अलीबहाद्दर यांच्या बाजूचा (म्हणजे अर्थात नाना फडणिसांच्या तर्फेचा) आहे. असा महादजीला संशय होता. एकदां तो फार आजारी पडला व औषधोपचारानें बरा होईना. तेव्हां अनुपगीरनें जादूटोणा, अनुष्ठान करून जयपूरवाल्यांस या बाबतींत साहाय्य करून आपल्या शरीरास समाधान न वाटे असा प्रकार केल्याचा पाटीलबाबानें त्याच्यावर आरोप ठेविला व त्याला पकडण्यास मथुरेस लखबादादा व रायाजी पाटील यांस ससैन्य पाठविले. त्यांनी जाऊन त्याला पकडून आणीत असतां रस्त्यांत अलीबहाद्दराच्या लष्करांत तो पळून गेला; आणि जरीपटक्याचा आश्रय घेऊन ''श्रीमंतांच्या जरीपटक्याजवळ आलों, आतां माझे अंगी मुद्दा शाबीद करावा, नंतर जें करणें तें करावें'' असें म्हणूं लागला. या बाबतींत अलीबहाद्दर व पाटीलबावा यांच्यांत बरेच दिवस बोलाचाली होऊन अखेर नाईलाजानें पाटीलबाबानें अनुपगीरचा नाद सोडला. पुढें अनुपगीरनें अलीबहाद्दरास सांगून बुंदेलखंडावर स्वाऱ्या करविल्या. अलीनें सर्व बुंदेलखंड हस्तगत केला. यावेळीं अनुपगीर हा त्याचा फार आवडता बनला होता. त्यानें त्याला १५-२ हजारांची जहागीर दिली. साऱ्या बुंदेलखंडाचा मुख्य अलीबहाद्दर बनल्यावर अनुपगीरचें महत्त्व जास्त वाढलें. पुढें तो आपल्या जहागिरींत राहून अनेक उलाढाल्या करीत होता. त्यानें १७८७ मध्यें जहागिरीची खंडणी देण्याचें नाकारून मराठयांच्या विरुद्ध बंड उभारलें. त्यास जयपूरकर व जोधपूरकर आणि दिल्लीचा बादशहा यांनींहि मदत केली. गोसाव्यांस बादशहानें दिल्लीस आसरा दिला. पुढें १७८९ त तो राणाखानामार्फत पाटीलबावास शरण आला. अलीबहाद्दरचा मुलगा समशेरबहाद्दर याचा हा पुढें दिवाणहि झाला होता. परंतु  पुढें इंग्रजास फितूर होऊन आपल्या धन्यावरच हा उलटला. कर्नल पॉवेल हा बुंदेलखंडांत काबीजातीस आला असतां अनुपगीर हा त्याला ससैन्य मिळाला (१६ सप्टेंबर १८०३) व त्या दोघांनीं बुंदेलखंड हस्तगत करून समशेरबहाद्दरचा पराभव बेटवा नदीवर केला (१३ आक्टो). याबद्दल इंग्रजांनीं त्याची जुनी जहागीर कायम केली व कांहीं नवीनहि दिली. परंतु अशा मिळालेल्या जहागिरीचा उपभोग घेण्यास तो पुढें फार न जगतां, थोडक्याच दिवसांनी काल्पी येथें मरण पावला (१८०४). तो गृहस्थाश्रमी होता. (ग्रँट डफ, बील; अयो. नबाब; झांशी. शं. इ.; राजवाडे खं. ६; म. रि म. वि. ३; सं. ऐ. टि. भा. ४; हो. कै. इ. महे. दरें. बा. प; कीन.)

Comments

Popular posts from this blog

Yashodharman

Varāhamihira

महान सम्राट कृष्णदेव राय