तुकोजी होळकर
तुकोजी होळकर
विभाग पंधरावा: तपून - धमन्या
तुकोजी होळकर— हा मल्हाररावाच्या फौजेंतील एक शिलेदार असून यावर मल्हाररावाची फार मर्जी होती. म्हणून याच्याशीं कोणत्याहि प्रकारचें नातें नसतांहि मल्हाररावाच्या मृत्यूनंतर (१७६६) आहिल्याबाईनें यास पेशव्यांच्या संमतीनेंच आपल्या सैन्यावरील अधिकारी नमलें व त्यानें पेशव्यांना १५ लक्ष ६२ हजार रु. नजर केले व सेनापतीचीं वस्त्रें घेतलीं. महत्वाच्या प्रसंगीं तो बाईची सल्ला घेई. बाई असतांना बहुधा तो पुण्यास पेशव्यांच्या दरबारीं असे. १७६९ सालीं सुमारें १५ हजार फौज बरोबर घेऊन हा विसाजी कृष्ण बिनीवाले याजबरोबर जाट व रोहिले यांवरील हिंदुस्थानच्या स्वारींत गेला. पण मल्हाररावाप्रमाणेंच यानेंहि नजीबखानास पाठीशीं घातलें, त्यामुळें शिंद्याचा बेत (नजीवाला नतिजा लावण्याचा) फसला. पुढेंहि मराठ्यांनीं १७७१ चा पावसाळा सुरू होण्यापूर्वी दिल्लीवर येऊन किल्ल्याखेरीज शहराचा सर्व भाग काबीज केला तेव्हां नजीब उद्दौल्याचा मुलगा झाबीतखान यास अटकेंत ठेविलें असतें; परंतु तुकोजी होळकरानें त्यास नजीबगडास सुखरूप पोहोंचवून दिलें.
बारभाईविरुद्ध मदत मागण्यासाठीं राघोबा इंदुरास आला तेव्हां यानें त्याचा आदरसत्कार केला, व हा त्याजबरोबर फौजेसह तापीतीरीं आला (१७७४). परंतु पुढें नाना व बापू यांनीं राघोबाची गांठ घेण्याकरितां यास आपल्या बाजूस वळवून घेतलें. तेव्हां हरिपंत फडके राघोबाच्या पाठीवर गुजराथेंत गेला असतां यानें त्याजबरोबर आपली फौज पाठविली होती ( फेब्रु. १७७५ ). मात्र एप्रिल महिन्याच्या सुमारास हा व शिंदे आपल्या फौजा घेऊन माळव्यांत परत आले. हा हरिपंत फडक्यास कां सोडून आला याचें कारण समजत नाहीं. परंतु राघोबास वाटे कीं, महादजी आपल्यास येऊन मिळणार व मग अर्थातच होळकरहि आपल्याविरुद्ध लढणार नाहीं.
याचा ओढा नानाविरुद्ध मोरोबादादाकडे होता. १७७७-७८ च्या सुमारास याला हरिपंत फडक्याच्या मदतीसं कर्नाटकांत जाण्याविषयीं सांगण्यांत आलें. पण तें त्यानें नाकारलें व मोरोबाचा पक्ष प्रबळ केला. परंतु महादजीच्या मार्फत ९ लक्ष रुपयांची लांच देऊन नानानें यास आपल्या बाजूस वळविलें (जून).
इ. स. १७७८ त इंग्रजांशी लढण्याकरितां पुण्याहून जी फौज पाठविण्यांत आली तींत तुकोजी होळकर होता; परंतु त्याचा कल राघोबाकडेच विशेष असल्यामुळें, त्यानें संधिसाधून इंग्रजांकडे जाऊं नये म्हणून महादजी व हरिपंत यांनीं त्याची फौज आपल्या फौजांमध्यें ठेविली होती. तसेंच स. १७८० त इंग्रजांबरोबर लढण्याकरितां महादजी गुजराथेकडे गेला तेव्हां तुकोजीहि त्याबरोबर गेला होता. स. १७८१ सालच्या बोरघांटाकडील इंग्रजांवरील मोहिमेंत मुख्य सैन्याचें आधिपत्य हरिपंत व तुकोजी यांच्याकडे होतें. परशुरामभाऊ पटवर्धन व गणेशपंत बेहरे यांच्या टिपूवरील स्वारींत नानांनीं याला त्यांच्या कुमकेस पाठविलें होतें (१७८६). त्यावेळीं कित्तुराखेरीज त्या प्रांतांतील इतर सर्व ठाणीं तुकोजीनें काबीज करून व लक्ष्मेश्वर परगण्यांतहि सावशी, मूळगुंद, गदग, तडस, बेहट्टी व नवलगुंद या सर्व ठिकाणीं मराठ्यांचीं ठाणीं बसवून, गणेशपंतास सावनुरास नबाबाच्या संरक्षणार्थ ठेवून तो स्वतः गदगजवळ टिप्पूचा सरदार बर्हाणउद्दीन याच्या तोंडावर राहिला. पुढें टिप्पूनें बर्हाणउद्दिनास बोलावून घेतल्यावर तुकोजीहि हरिपंतास जाऊन मिळाला. यावेळीं हरिपंतहि बहुतेक बाबतींत त्याच्या सल्ल्याप्रमाणेंच वागे. यानंतर टिप्पूनें मराठ्यांशीं जो तह केला तो तुकोजीमार्फतच घडवून आणला. तिकडून परत आल्यावर तो महेश्वरीं जाऊन बाईस भेटला.
पुढल्या वर्षी नानांनीं तुकोजीस महादजीच्या मदतीसाठीं उत्तर हिंदुस्थानांत रवाना केलें. चंबळा नदीच्या उत्तरेस जेवढा मुलूख पादाक्रांत होईल त्याच्या पेशवे, होळकर व शिंदे यांच्या दरम्यान तीन सारख्या वाटण्या व्हाव्या असें यावेळीं ठरलें होतें (१७८८).
हिंदुस्थानांत आल्यावर तुकोजीचें सारें लक्ष्य महादजीनें जो नवीन मुलूख मिळविला होता त्यांतील आपणांस वांटा कसा मिळवून घेतां येईल इकडे होतें. त्यामुळें तो महादजी शिंद्याच्या प्रत्येक मसलतींत स्वतःकडून शक्य तितका अडथळा आणी. महादजी व इस्मायलबेग यांच्यामध्यें वितुष्ट आणण्याकरितां त्यानें इस्मायलबेगचीं गांवें लुटलीं (१७९०); यावेळीं महादजीचें मोंगलांशीं व रजपुतांशीं युद्ध चालू होतें. अशा संधींत तुकोजी हा असल्या अडचणी उत्पन्न करी. त्यानें जवळ जवळ मल्हाररावांची घरबुडवी पद्धत उचलली होती. अशा अडचणींत त्याच्याशीं महादजीनें कांहीं तडजोडहि केली तरी सुद्धां इस्मायलबेगशीं महादजीची पाटण येथें जी लढाई झाली तींत यानें कांहींच मदत केली नाहीं (१७९०). महादजीनें बादशहाचें नांव करून डी बॉईनच्या हाताखालीं कवायत शिकविलेल्या पायदळाच्या तीन ब्रिगेडी तयार केल्या तेव्हां तुकोजीला महादजीविषयीं अधिकाधिकच मत्सर वाटूं लागला व त्यानेंहि ड्यूडरनेक नांवाच्या फ्रेंच माणसाच्या हाताखालीं चार कवायती पलटणें तयार केलीं (१७९२). तुकोजी महादजीच्या कारभारांत इतकी ढवळाढवळ करूं लागला कीं, मी आतां पुण्यास जाऊन पेशव्यांकडून होळकरास हिंदुस्थानांतून परत बोलावितों असेंहि महादजीनें कित्येक वेळां म्हणून दाखविलें.
या सुमारास महादजीचा सरदार पेरॉन हा कानूंदचा किल्ला हस्तगत करण्यास निघाला तेव्हां तुकोजीनें इस्मायलबेग यास किल्ल्यांत असलेल्या नजीबखानाच्या स्त्रीस मदत करण्यास गुप्तपणें उत्तेजन दिलें. कानूंदचा किल्ला हस्तगत झाल्यानंतर होळकर व शिंदे यांचीं सैन्यें राजपुतान्यांत खंडणी गोळा करीत असतां त्यांच्यामध्यें वांटणीसंबंधी कांहीं तंटा होऊन अजमेरजवळ लखैरी येथें लढाई झाली. तींत आपल्या लोकांचा पराभव झाल्याविषयीं जेव्हां तुकोजीस माळव्यांत कळलें तेव्हां त्या गोष्टीचा सूड घेण्याकरितां त्यानें उज्जेनीस जाऊन शिंद्याचें तें राजधानीचें शहर लुटून फस्त केलें. पुण्याला हें वर्तमान कळल्यावर नाना व महादजी यांनीं तुकोजीस व पेरॉन यांस कळविलें कीं तूर्त तुम्ही आपसांत भांडूं नये; पेशवे लवकरच तुमच्या भांडणाचा निकाल करतील. यानंतर महादजी थोड्याच दिवसांत मरण पावला (१७९४) व उत्तरेकडे तुकोजी अर्थातच प्रमुख होऊन बसला.
तुकोजी प्रथमत: बरेच दिवसपर्यंत कवायती पायदळांच्या विरुद्ध होता. परंतु राजपुतान्यांतील किल्ले सर करण्याच्या कामीं महादजीस डी ब्रॉईनच्या पलटणींचा किती उपयोग झाला हें त्याच्या नजरेस आलें तेव्हां त्यानें ड्यूडरनेकच्या हाताखालीं चार कवायती पलटणी तयार करविल्या; व शेवटीं लखेरीच्या लढाईत ड्यूडरनेकच्या पलटणींनीं जी शिस्त दाखविली ती पाहून त्यानें आणखी चार पलटणी उभारल्या (१७९४). या पलटणींनीं कर्दळाच्या लढायांत चांगली कामगिरी केली.
अहिल्याबाई स. १७९५ (आगष्ट १३) मध्यें वारल्यावर तुकोजीच्या हातीं होळकरशाहीचीं राज्यसूत्रें आलीं. खर्ड्याच्या लढाईमध्यें तुकोजी होता. त्यावेळीं त्याच्याजवळ १०,००० सैन्य (ड्यूडरनेकचें २ हजार) होतें. या लढाईत लष्कराच्या हालचालीबद्दल नानानें तुकोजी व जिवबा बक्षी यांनीं सुचविलेली योजनाच पसंत केली.
खर्ड्याच्या लढाईनंतर तुकोजीनें जेजुरीस आपली छावणी दिली होती. निजामअल्लीच्या मुलानें आपल्या बापाविरुद्ध बंड केल्याचें समजतांच तो पुण्यास आला होता. यावेळीं वृद्धापकाळामुळें तो क्षीणबुद्धी झाला होता; त्यामुळें त्याच्या हाताखालचीं सर्व माणसें नानाच्या अनुरोधानें चालूं लागलीं. सवाई माधवराव मरण पावला तेव्हां तुकोजी पुण्यांतच होता. यशोदाबाईच्या मांडीवर दत्तकपुत्र देण्याची नानानें सूचना पुढें मांडली तेव्हां यानें तिला संमत्ति दिली (१७९५). पुढें नानानें महाडहून बाळोबा तात्या व परशुरामभाऊ यांनां कैद करून बाजीरावास पेशवाई देण्याचें जें कारस्थान केलें, त्यांतहि त्याला तुकोजीची सर्व प्रकारें मदत होती. यानंतर १७९७ सालीं (आगष्ट १५) तुकोजीचें देहावसान झालें. त्याला एकूण चार पुत्र होते त्यांपैकीं काशीराव व मल्हारराव हे दोघे औरस असून यशवंतराव व विठूजी हे दासीपूत्र होते.
तो मुत्सद्दी नसून शिपाईगडी होता; महत्त्वाच्या प्रसंगीं तो अहिल्याबाईचा सल्ला घेई. त्याच्या मृत्यूमुळें होळकर घराण्यांत राज्याबद्दल तंटे लागले. काशीराव क्षुद्रबुद्धी असल्यानें राज्यास लायक नव्हता, मल्हाराव शूर पण जुलुमी होता. त्यानें तुकोजीच्या हयातींतच एकदां होळकरीसंस्थानांत गडबड केल्यामुळें तुकोजीनें त्याची खरडपट्टी काढिली होती. त्याचें मत काशीरावास वारस करावें असें होतें; व त्याप्रमाणें त्यानें आपल्या शेवटच्या दुखण्यांत त्याला पुण्यास बोलावून त्याच्या हवालीं गादी केली ( १७९६ नोव्हेंबर ). पण त्यामुळें मल्हारराव रुसून दुसरीकडे गेला तुकोजीच्या मृत्यूनंतर या दोघा भावांत तंटे सुरू झाले. [ग्रांट डफ. पु. २;३ ऐति. लेखसंग्रह भाग ४ ते ९; नाडकर्णी— होळकरांच्या राज्याचें सामान्य वर्णन.]
Comments
Post a Comment