कणाद - वैशेषिक न्यायशास्त्राचा कर्ता.
कणाद - वैशेषिक न्यायशास्त्राचा कर्ता. सहा आस्तिकांतील एक उत्तराध्ययन सूत्रवृत्ति नामक जैन ग्रंथाच्या तिसर्या अध्ययनांत याच्याविषयी, ''हा अंत रंजिका नामक नगरचा राजा जो बलश्री त्याच्या कारकीर्दीत होता'' असें आढळतें.
कणाद हें याचें खरें नांव नसून, यानें कण (अणु) वादाचा जोरानें पुरस्कार केला म्हणून याला कणाद, कणभक्ष किंवा कणभुज् ('कण खाणारा') अशा तर्हेचीं निंदाव्यंजक नांवें पडलीं. कणादानें रचिलेल्या प्रसिद्ध वैशेषिक दर्शनास औलुक्यदर्शन असेंहि म्हणतात, त्यावरून त्याचें नांव उलुकि असावें असें कोणी मानतात; पण वायुपुराणांत अक्षपाद, कणाद, उलुकि व वत्स हे शिवपुत्र असल्याचें सांगितलें आहे. तेव्हां कणाद व उलुकि हे दोन निराळे पुरुष त्यावेळीं तरी मानीत असें वाटतें. कणादानें वैशेषिक सूत्रें इ.स. २०० आणि ४०० या दरम्यान रचिलीं असावींत. या दर्शनांत दहा अध्याय व ३७० सूत्रें आहेत. विश्वांतील सर्व पदार्थांचे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय असे सहा वर्ग पडतात. हेच सहा मुख्य पदार्थ आहेत असें वैशेषिकांचे मत आहे. या पदार्थांसच उद्देश म्हणतात. त्यांचीं लक्षणें व परीक्षा या ग्रंथांत केली आहे. या सहा पदार्थांपैकीं विशेष हा एक स्वतंत्र पदार्थ आहे असें प्रतिपादिल्यावरून या मताच्या लोकांनां वैशेषिक हें नांव पडलें ('वैशेषिक' पाहा). द्रव्याचे परमाणु असतात ही कल्पना प्रथम कणादानें काढली. तेव्हो वैशेषिक दर्शनांत प्रथमच परमाणुवादाची उपस्थिती झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं
Comments
Post a Comment